Join us
Daily Top 2Weekly Top 5

Birthday special : ​कॉफी शॉपमधील त्या एका ‘नोट’ने बदलले कंगना राणौतचे नशीब! एका मॅगझिनने केले होते पाच वर्षांसाठी बॅन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 11:13 IST

बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत  हिचा आज (२३ मार्च) वाढदिवस. २३मार्च, १९८७ रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्याजवळील सुरजपूर (भाबंला) येथे ...

बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत  हिचा आज (२३ मार्च) वाढदिवस. २३मार्च, १९८७ रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्याजवळील सुरजपूर (भाबंला) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात कंगनाचा जन्म झाला. चित्रपट आणि अभिनय याशिवाय स्पष्टवक्तेपणा आणि खासगी आयुष्यामुळे कंगना नेहमीच चर्चेत असते. कंगनाने डॉक्टर व्हावे, अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. मात्र कंगना बारावीत नापास झाली. पुढे आईवडिलांशी भांडून ती दिल्लीत आली होती. येथेच  अभिनयातील बारकावे शिकून अभिनय क्षेत्राकडे वळली. कंगनाने बॉलिवूडमध्ये बराच संघर्ष केला. कुठलाही गॉडफादर नसताना स्वबळावर ती इथपर्यंत पोहोचली.आज कंगना बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. पण तिच्या या यशामागे खूप मोठा संघर्ष आहे. ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूड डेब्यू केला. पण ‘फॅशन’,‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटांनी कंगनाला खरी ओळख दिली. कंगनाच्या फिल्मी करिअरबद्दल चाहत्यांना ठाऊक आहेच. पण अशाही काही गोष्टी आहेत, ज्या फार कमी लोकांना माहित आहेत. कंगनाला अनुराग बासू यांनी ब्रेक दिला होता. अनुरागने सर्वप्रथम कंगनाला एका कॉफी शॉपमध्ये पाहिले होते आणि नंतर तिलाच आपल्या ‘गँगस्टर’साठी साईन केले.एका मुलाखतीत कंगनाने याबद्दल सांगितले होते. ‘मी फॅशन शोजसाठी नेहमी मुंबईत यायचे. एकदिवस मी कॉफी शॉपमध्ये बसलेली असताना अनुराग बासू यांनी मला पाहिले. त्यांनी वेटरच्या हाताने मला एक नोट पाठवली. त्यावर त्यांचे नाव आणि नंबर होता. सोबतचं मी त्यांना फोन करावा, असेही लिहिले होते. त्यावेळी मी प्रचंड भोळी होती. मी त्या वेटरलाच प्रश्न विचारून हैरान केले. अखेर अनुराग स्वत:चं माझ्या टेबलजवळ आलेत आणि त्यांनी मला स्वत:बद्दल सांगितले. त्यांच्या अपकमिंग चित्रपटासाठी ते आॅडिशन घेत आहेत आणि मी या आॅडिशनला यावे, असे ते मला म्हणाले. मी ‘गँगस्टर’साठी अनेकदा आॅडिशन्स दिले. चित्रपटाचे निर्माते महेश भट्ट यांनी तीनदा माझे आॅडिशन घेतले. यानंतर अनेक महिने मी प्रतीक्षा केली. याकाळात अनुराग बासू यांनी माझा फोन घेणेही बंद केले. मी कमालीचे निराश झाले. पण अचानक एकदिवस मला फोन आला आणि  मला ‘गँगस्टर’ मिळाला,’ असे कंगनाने सांगितले होते.‘गँगस्टर’ मिळाला नसता तर कदाचित मी अ‍ॅडल्ट चित्रपटांत काम करणे सुरू केले असते, असेही कंगना म्हणाली होती. ‘माझ्या आयुष्याला ‘गँगस्टर’ने मोठे वळण दिले. त्या काळात मला अ‍ॅडल्ट चित्रपटांच्या खूप आॅफर्स मिळत होत्या. त्या आॅफर्स माझ्यासाठी योग्य नाहीत, हे मला कळत होते. पण त्यादिवसांत मी त्याही स्वीकारण्यास तयार होते,’ असे कंगना या मुलाखतीत म्हणाली होती.ALSO READ : केवळ हृतिक रोशनचं नाही तर या अनेकांशी झालेयं कंगना राणौतचे भांडण!संघर्षाच्या दिवसांत कंगनाला एका मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकण्याची संधी मिळाली होती. पण पुरेशी माहिती नसल्याने कंगनाला या मॅगझिनने पाच वर्षांसाठी बॅन केले होते. एका मुलाखतीत कंगनाने हा किस्सा सांगितला होता. तिने सांगितले होते की, ‘एका मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकण्याची संधी माझ्याकडे चालून आली होती. माझा मॅनेजर तुमच्याशी बोलेल. तोच माझी फी तुम्हाला सांगेल,असे मी मॅगझिनच्या वतीने आलेल्या व्यक्तीला म्हटले आणि त्याला रवाना केले. पण नंतर या मॅगझिनने मला पाच वर्षांसाठी बॅन केले. याचे कारण मला खूप दिवसानंतर कळले. कारण ब्रांडच्या एंडोर्समेटमध्ये आणि ब्रांड बिल्ड करण्यामध्ये काय फरक आहे, हे मला त्यावेळी माहित नव्हते. कुठलेही मॅगझिन एखाद्या कलाकाराला त्याच्या कव्हरपेजवर प्रकाशित करते, तेव्हा त्यासाठी कुठलीही डिल वा करार होत नाही. हेही मला हे ठाऊक नव्हते. ’ अशा अनेक चुकांमधून कंगना शिकली आणि यशाच्या शिखरावर जावून पोहोचली.