birthday special : ‘हुस्र की मल्लिका’ मधुबालाच्या आयुष्यात आल्या ‘या’ व्यक्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 15:29 IST
भारतीय चित्रपटसृष्टीतील मधुबाला म्हणजे सौंदर्याची खाण. ‘हुस्र की मल्लिका’ म्हणून ओळखल्या जाणाºया मधुबालाचे आयुष्य अनेक रहस्यांनी भरलेले आहे. अनेक ...
birthday special : ‘हुस्र की मल्लिका’ मधुबालाच्या आयुष्यात आल्या ‘या’ व्यक्ती!
भारतीय चित्रपटसृष्टीतील मधुबाला म्हणजे सौंदर्याची खाण. ‘हुस्र की मल्लिका’ म्हणून ओळखल्या जाणाºया मधुबालाचे आयुष्य अनेक रहस्यांनी भरलेले आहे. अनेक प्रेम कथा आणि त्या कथेतील वेदना असे सगळे किस्से मधुबालाबद्दल सांगितले जाातात. प्रेमाचा दिवस म्हणजे १४ फेबु्रवारीला मधुबालाचा जन्म झाला. मधुबाला आज आपल्यात नाही आणि यापुढेही तिची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. तिच्याइतकी सुंदर अभिनेत्री आजपर्यंत बॉलिवूडला मिळालेली नाही. मधुबाला एका पठाणी कुटुंबात जन्मली. मधुबालाचे वडील अतिशय कडक शिस्तीचे होते. मधुबालाचे खरे नाव मुमताज जहां बेगम असे होते. मधुबाला ११ बहीण-भावांमध्ये पाचव्या क्रमांकाचे अपत्य होते. मधुबाला भविष्यात खूप मोठे नाव कमावणार, असे तिचे एक नातेवाईक नजूमी नेहमी म्हणत. ही मुलगी खूप मोठे नाव, पैसा, प्रसिद्धी कमावणार. मात्र तिचा कधीच खरे प्रेम मिळणार नाही, अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. त्यांची ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. मधुबाला इतकी सुंदर होती की, तिला बघताक्षणीच सगळे तिच्या प्रेमात पडायचे. तिची तुलना हॉलिवूडची हिरोईन मर्लिन मन्रो हिच्यासोबत केली जाते. मधुबालाबद्दल एक गोष्ट बोलली जाते. ती म्हणजे, ती ज्या कुण्या हिरो वा डायरेक्टरसोबत काम करायची,त्याच्या प्रेमात पडायची. तिला जो कुणी आवडायचा त्याला ती गुलाब आणि लव्ह लेटर देऊन प्रपोज करायची. अर्थात याऊपरही मधुबालाच्या वाट्याला खरे प्रेम कधीच आले नाही. तिच्या आयुष्यात सात लोक आलेत. यापैकी तिने किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. जाणून घेऊ या मधुबालाच्या आयुष्यातील काही रहस्यमयी गोष्टी.... मधुबालाच्या पहिल्या प्रेमाचे नाव लतीफ होते. लतीफ मधुबालाच्या बालपणीचा मित्र होता. लतीफ दिल्लीला राहायचा. त्याकाळात मधुबाला तिच्या कुटुंबासोबत मुंबईत शिफ्ट झाली. तिच्या जाण्याने लतीफ डिप्रेशनमध्ये गेला. दिल्ली सोडताना मधुबालाने लतीफला एक गुलाबाचे फुल दिले होते. मधुबालाच्या निधनापर्यंत लतीफने ते सांभाळून ठेवले होते. शेवटी मधुबालाच्या पार्थिवावर त्याने ते फुल अर्पण केले. मुंबईमध्ये दिग्दर्शक किदार यांनी मधुबालाला चित्रपटात येण्याची आॅफर दिली. स्क्रीन टेस्टदरम्यान मधुबालाला पाहताच किदार तिच्या प्रेमात बुडाले. त्यावेळी मधुबाला केवळ १४-१५ वर्षांची होती. प्रेमाचा अर्थही तिला कळत नव्हता. पण याकाळात ती काही काळ किदार यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहिली. पण लवकरच हे नाते तुटले. मधुबालाचे मन कुठल्याही गोष्टीत फार काळ रमत नव्हते, असे म्हटले जाते. त्यामुळे ती किदार यांच्यासोबत केवळ डायरेक्टर म्हणून वावरू लागली. यानंतर ‘महल’ या चित्रपटात डायरेक्टर कमाल अमरोही यांनी मधुबाला कास्ट केले. या चित्रपटादरम्यान मधुबाला कमाल अमरोही यांच्या प्रेमात आकंठ बुडाली. अमरोही तासन तास मधुबालासोबत घालवू लागले. हा काळ मधुबालाच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर काळ होता. मधुबालाच्या वडिलांनाही हे नाते माहित होते. दोघांचेही लग्न व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पण अमरोही विवाहित होते आणि मधुबाला त्यांना कुण्या दुसºयाशी शेअर करू शकत नव्हती. मधुबालाने अमरोही यांना पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्याची गळ घातली. पण मुस्लिम धर्मानुसार, अमरोही पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता मधुबालासोबत लग्न करू इच्छित होते. पण मधुबालाला हे मान्य नव्हते. मधुबालाने यासाठी अमरोही यांना लाखो रुपए देऊ केलेत. पण अमरोही मानले नाहीत. मग काय, मधुबालाने त्यांना कायमचे सोडले. आयुष्यात यापुढे कधीही त्यांचे तोंड न पाहण्याची शपथ घेतली. ‘बादल’ या चित्रपटातील त्यांचा हिरो प्रेमनाथ यांच्यासोबतही मधुबालाचे अफेअर असल्याचे बोलले जाते. शूटींगच्या पहिल्याच दिवशी प्रेमनाथ मेकअप रूममधून बाहेर पडत असताना मधुबालाने त्यांना एक गुलाब आणि प्रेमपत्र दिले. यामुळे प्रेमनाथ प्रचंड घाबरले. त्या पत्रात लिहिले होते, तू माझ्यावर प्रेम करत असशील तर हा गुलाब कबुल कर. नाहीतर परत कर’. जगातील सगळ्यांत सुंदर महिलेचा प्रेमप्रस्ताव प्रेमनाथ यांनी अर्थातच कबुल केला. यानंतर दोघेही हळूहळू जवळ आलेत. यानंतर काहीच आठवड्यात प्रेमनाथ आपल्याला सोडून जाणार, या भीतीने मधुबालाला ग्रासले आणि ती प्रेमनाथपासून दूर झाली. प्रेमनाथ मधुबालाचे हे वागणे समजणार, त्याआधीच मधुबालाने अभिनेता अशोक कुमार यांनाही तसेच गुलाब पुष्प आणि प्रेमपत्र दिले. अशोक कुमार यांनी प्रेमनाथ यांना ही गोष्ट सांगितली. ते ऐकून प्रेमनाथ अचंबित झालेत. यानंतर प्रेमनाथ यांनी काय करावे, तर मधुबालाचे यापुढे कधीही तोंड न पाहण्याची शपथ घेतली. मधुबाला आता १७ वर्षांची होती. पण आयुष्यात एकाकी होती. याचकाळात तिच्या आयुष्यात दिलीप कुमार यांची एन्ट्री झाली. मधुबाला आणि दिलीप कुमार यांची प्रेमकथा कुठल्याही रोमँन्टिक चित्रपटापेक्षा कमी नव्हती. पण मधुबालाचे पिता या प्रेमकहानीतील व्हिलन ठरले. मधुबालाने दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले तर त्यांच्या घरचा खर्च कसा चालेल, अशी भीती त्यांना होती. यामुळे दिलीप यांनी मधुबालाला त्यांच्या व तिच्या वडिलांपैकी कुणा एकाची निवड करायला सांगितले. मधुबालाने आपल्या वडिलांची निवड केली आणि एक प्रेम कथा संपली. दिलीप कुमार यांच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर मधुबाला पुन्हा एकाकी झाली. यादरम्यान किशोर कुमार यांनी मधुबालाला सोबत केली. आता आपण लग्न करावे, असे मधुबालालाही वाटू लागले आणि तिने किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. किशोर कुमार मधुबालाच्या प्रेमात वेडे होते. त्याकाळात दिलीप कुमार आर्थिक तंगीत होते. मधुबालाने तिच्या संपत्तीची काळजी घ्यावी, असे किशोर कुमार यांची इच्छा होती. पण याचदरम्यान मधुबालाच्या हृदयाला छिद्र असल्याचे कळले. केवळ एकच नाही तर मधुबालाला अनेक गंभीर आजारांनी घेरले. तिच्या हृदयाला छिद्र होते. फुफ्फुसाबाबतही समस्या होती. याशिवाय तिच्या शरिरात गरजेपेक्षा अधिक रक्त बनू लागले होते. यामुळे तिच्या नाकातून आणि तोंडातून सतत रक्त वाहायचे. जोपर्यंत अतिरिक्त रक्त बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत ते वाहत राहायचे. यानंतर मधुबाला कायम आजारी राहायला लागली. किशोर कुमार यांनी मधुबालाची तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेतली. ९ वर्षे मधुबाला आजाराशी झुंज देत होती. उपचारासाठी तिला इंग्लंडलाही नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी मधुबालाची स्थिती पाहून शस्त्रक्रियेस नकार दिला. यानंतर आपण फार काळ जगणार नाही, हे मधुबालाला कळून चुकले. तिने किशोर कुमार यांना दुसरे लग्न करण्यास सांगितले. २३ फेबु्रवारी रविवारच्या दिवशी अवघ्या ३६ व्या वर्षी मधुबालाने अखेरचा श्वास घेतला.