Join us

लाइव्ह बुलेटीनमध्ये बीबीसीने शशी कपूरऐवजी महानायक अमिताभ बच्चन यांना वाहिली श्रद्धांजली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 20:17 IST

सोमवारी रात्री दहा वाजेच्या बुलेटीनमध्ये बीबीसीकडून ही घोडचूक झाली. बीबीसीने याबाबत जाहीरपणे माफी मागितली, वाचा सविस्तर!

रोमॅण्टिक आणि हॅण्डसम अभिनेता शशी कपूर यांच्या निधनाने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर विदेशी मीडियाकडूनदेखील त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मात्र याचदरम्यान एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीकडून एक मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. होय, बीबीसी लंडनने सोमवारच्या लाइव्ह बुलेटीनमध्ये शशी कपूर यांच्याऐवजी महानायक अमिताभ बच्चन अन् त्यानंतर ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली. जेव्हा अ‍ॅँकर लाइव्ह बुलेटीन देत होते, तेव्हा त्यांनी शशी कपूरच्या निधनाची बातमी वाचली, परंतु त्याचदरम्यान महानायक अमिताभ बच्चन अन् त्यानंतर ऋषी कपूर यांचे फुटेज दाखविण्यात आले. बीबीसीच्या या मोठ्या घोडचुकीमुळे भारतात एकच चर्चा घडून आली. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री दहा वाजेच्या बुलेटीनची एक क्लिक ट्विरटवर मोठ्या प्रमाणात ट्रोल केली गेली. जेव्हा ही बाब बीबीसीच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी जाहीरपणे माफी मागितली. ट्विटरवर लोकांनी हा व्हिडीओ ट्रोल करताना लिहिले की, ‘बीबीसीच्या महानतेविषयी सांगण्यासाठी ही छोटीशी क्लिप पुरेशी आहे. एका युजरने तर बीबीसीच्या अज्ञानाचे चांगलेच धिंडोळे निघाले. तर एका युजरने म्हटले की, ‘बीबीसीने भारतीय सिनेमाचा अपमान केला.’ पुढे बीबीसी न्यूजचे एडिटर पॉल रॉयल यांनी या प्रकरणाची संवेदनशीलता आणि गंभीरता लक्षात घेऊन एक ट्विट केले. ट्विटमध्ये लिहिले की, शशी कपूर यांच्याऐवजी दुसरेच फुटेज दाखविल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या दुर्दैवी घटनेबद्दल आम्ही माफी मागतो. दरम्यान, शशी कपूर यांचे सोमवारी सायंकाळी वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. आज मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुज येथे राजकीय सन्मानात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होत्या.