ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. मोहनलाल यांना हा सन्मान मिळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांसोबतच बॉलिवूड आणि भारतीय मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी त्यांचं अभिनंदन केलंय. अशातच बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनी x ट्विटरवर एक पोस्ट लिहून मोहनलाल यांना हा सन्मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. काय म्हणाले बिग बी?
आपल्या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी मोहनलाल यांना त्यांच्या कारकीर्दीत मिळालेला हा 'अत्यंत योग्य सन्मान' आहे, असं म्हटलंय. अमिताभ लिहितात, "मोहनलालजी, तुम्हाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. हा अत्यंत योग्य सन्मान आहे! खूप खूप अभिनंदन. मी तुमच्या कामाचा आणि अभिनयाचा खूप मोठा चाहता आहे. खोल भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही जी अभिनयाची शैली वापरता ती खरोखरच आश्चर्यकारक आहे. तुम्ही तुमच्या अतुलनीय प्रतिभेने आम्हाला नेहमीच प्रेरणा देता. मी कायमच तुमचा डाय हार्ड फॅन बनून राहीन."
अमिताभ बच्चन आणि मोहनलाल यांनी यापूर्वी 'कंधार' (२०१०) आणि 'राम गोपाल वर्मा की आग' (२००७) यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दरम्यान, प्रसिद्ध मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना २०२३ सालचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही घोषणा केली. मोहनलाल यांना २३ सप्टेंबर २०२५ रोजी ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल.