Join us

"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 09:18 IST

भोजपुरी अभिनेता आणि माजी खासदार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे. मराठी बोलत नाही, हिंमत असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा असं थेट चॅलेंजच त्यांनी राज ठाकरेंना दिलं आहे. 

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाला करण्यात आलेल्या विरोधाचं आता वादात रुपांतर होत आहे. बिजनेसमन सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना ३० वर्ष महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलणार नाही. काय करायचं ते करा, असं थेट आव्हान दिलं होतं. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती. आता भोजपुरी अभिनेता आणि माजी खासदार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे. मराठी बोलत नाही, हिंमत असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा असं थेट चॅलेंजच त्यांनी राज ठाकरेंना दिलं आहे. 

"कोणामध्ये दम असेल तर मला महाराष्ट्रातून काढून दाखवा. मी मराठी बोलत नाही, मला काढून दाखवा. कोणत्याही नेत्याला मी खुलं चॅलेंज देतो. मी भोजपुरी बोलतो आणि मी महाराष्ट्रात राहतो. हिंमत असेल तर मला काढून दाखवा. हे घाणेरडं राजकारण करू नका. मी स्वत: एक राजकीय नेता आहे आणि कलाकारही आहे. राजकारण हे नेहमी लोकांच्या हितासाठी असलं पाहिजे. देशाच्या विकासासाठी असलं पाहिजे. मराठी सुंदर भाषा आहे. पण शिकण्याची इच्छा असेल तर ती शिकावी. यासाठी कोणावरही भाषा शिकण्यासाठी जबरदस्ती केली गेली नाही पाहिजे", असं चॅलेंज त्यांनी दिलं आहे. 

"सगळ्या भाषा सुंदर आहेत. त्यामुळे सगळ्यांनी शिकल्या पाहिजेत. पण, जर कोणाला रस नसेल तर जबरदस्ती केली गेली नाही पाहिजे. हे घाणेरडं राजकारण आहे. हिंदी देशाची राष्ट्रभाषा आहे. आणि आपण हिंदीमध्ये याच्यासाठी संवाद साधतो कारण आपल्याला एकमेकांच्या भाषा समजणार नाहीत. कारण, आपल्या देशात अनेक भाषा, धर्म आणि संप्रदायाचे लोक राहतात. भाषेचं घाणेरडं राजकारण कोणीही करू नये. देशाला तोडण्याचं काम कोणीही करू नये", असंही निरहुआ म्हणाले आहेत. 

टॅग्स :भाजपाराज ठाकरेसेलिब्रिटी