Join us

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारीत वेबसीरिज, निर्भयाच्या मित्राच्या भूमिकेत संजय बिश्नोई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 17:48 IST

नेटफ्लिक्सवर लवकरच 'दिल्ली क्राईम' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेबसीरिज निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणावर आधारीत आहे.

नेटफ्लिक्सवर लवकरच 'दिल्ली क्राईम' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेबसीरिज निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणावर आधारीत आहे. जवळपास सात तासांची ही सीरिज असून या सीरिजचे दिग्दर्शन रिची मेहताने केले आहे. यामध्ये या बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या अटकेपासून पुढील घटनाक्रम दाखवण्यात आला आहे. या वेबसीरिजमध्ये पोलिसांच्या आणि समाजाच्या दृष्टीकोनातून या घटनेवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या सीरिजमध्ये अभिनेता आणि कास्टिंग डिरेक्टर संजय बिश्नोई दिसणार आहे. 

संजयने या सीरिजमध्ये आकाशची भूमिका केली आहे. तो पीडितेचा मित्र होता. जो तिच्यासोबत बसमध्ये प्रवास करत होता. या संपूर्ण घटनेचा तो साक्षीदार होता. त्यालाही मारहाण करण्यात आली होती. या भूमिकेबाबत संजयने सांगितले की, 'हे पात्र मी त्याने काय केले असेल याचा तर्कवितर्क न लावता साकारले आहे. मी या वेबसीरिजची दिग्दर्शिका रिची मेहताची स्क्रीप्टलाच ध्यानात ठेवून काम केले. मी तिच्या मित्रालादेखील भेटलो नाही. मात्र मी कुठेतरी वाचले होते की तो माझ्यासारखा आहे.'

या घटनेनंतर समाजात परिवर्तन झाले आहे. लोक अधिक संवेदनशील झाले असून याविरोधात आवाज उठविण्यासाठी एकजूट करायला तयार आहेत. याच कारणामुळे रिचीने सहा वर्षे अभ्यास करण्यात घालवले आणि हा प्रोजेक्ट बनवला. मला म्हणायचे आहे की हा खूप मोठा काळ होता. पण जर या घटनेने तिला प्रेरीत केले आहे आणि तिने प्रामाणिकपणे ते दिल्ली क्राईम वेबसीरिजमध्ये मांडले आहे. या सीरिजमधून नक्कीच लोकांचे परिवर्तन होईल, असे संजयने सांगितले. 

निर्भया बलात्कार प्रकरणाची चौकशी दिल्लीच्या डीसीपी वर्तिका चतुर्वेदी यांनी केले होते. या सीरिजमध्ये ही भूमिका शेफाली शाहने केली आहे. शेफाली शाह व संजय यांच्याव्यतिरिक्त या वेबसीरिजमध्ये आदिल हुसैन, रसिका दुग्गल, राजेश तेलंग व यशस्वी दाहिमा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

टॅग्स :निर्भया गॅंगरेप