बॉलिवूड अभिनेता आणि दिवंगत कलाकार इरफान खान यांचा मुलगा बाबिल खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्याने बॉलिवूडबाबत खळबळजनक वक्तव्य केलं होतं. या व्हिडिओत त्याने शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी अशा काही सेलिब्रिटींची नावंही घेतली होती. या व्हिडिओत बाबिल रडताना दिसत होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळाने तो डिलीट करत नंतर बाबिलने त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंटही डिलीट केलं होतं. आता या व्हिडिओवर बाबिलच्या कुटुंबीयांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
बाबिलच्या टीमकडून स्पष्टीकरण
"गेल्या काही वर्षात बाबिल खानला त्याच्या कामामुळे आणि त्याने त्याच्या मानसिक आरोग्याबाबत उघडपणे बोलल्याने खूप प्रेम मिळालं. प्रत्येकाप्रमाणेच बाबिललाही त्याच्या आयुष्यातही कठीण दिवसांचा सामना करावा लागत आहे. हे दिवस त्यापैकीच एक आहेत. त्याच्या हितचिंतकांना आम्ही सांगू इच्छितो की तो सुरक्षित असून आता बरा आहे.
यादरम्यानच बाबिलने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. या व्हिडिओत बाबिलने त्याच्या मित्रांचं आणि ते भारतीय सिनेइंडस्ट्रीत ज्याप्रकारे योगदान देत आहेत या गोष्टीचं कौतुक केलं. त्याने अनन्या पांडे, अर्जुन कपूर, शनाया कपूर, अरजित सिंह, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव या कलाकारांची नावं यासाठी घेतली कारण हे कलाकार खरंच त्याला आवडतात.
आम्ही मीडिया आणि चाहत्यांना विनंती करतो की अर्धवट व्हिडिओ पाहून त्याच्या वक्तव्याचा कोणताही चुकीचा अर्थ काढू नका".
नेमकं काय म्हणाला होता बाबिल?
"बॉलिवूड खूपच खराब आणि फेक इंडस्ट्री आहे. मी स्वतः याचा भाग राहिलो आहे. इथे फार थोडे लोक खरे आहेत, जे बॉलिवूडला सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. णजे मला तुम्हाला सांगायचं आहे की शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अगदी अरिजित सिंग सारखे लोक आहेत. अजून बरीच नावे आहेत. बॉलिवूड खूपच बनावट आहे".