कोरोनाची दुसरी लाट भारतात आली असून दिवसेंदिवस कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता रुग्णालयातील बेड अपुरे पडू लागले आहेत. तसेच ऑक्सिजन सिलेंडर, औषधं, इंजेक्शनची कमतरता अनेक रुग्णालयात भासत आहे. बेड मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.
बाबा सहगलच्या वडिलांना रुग्णालयात बेड न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागला. बाबा सहगलचे वडील जसपालसिंह सहगल यांचे सोमवारी कोरोनाने निधन झाले असून ते 87 वर्षांचे होते. बाबाने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, माझे वडील माझी बहीण आणि तिच्या पतीसोबत लखनऊमधील गोमतीनगर परिसरात राहात होते. त्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ते आठ दिवसांपासून होम क्वांरंटाईन होते. त्यांची तब्येत सुधारत देखील होती. पण अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांची ऑक्सिजन पातळी प्रचंड कमी झाली होती.
बाबाने पुढे सांगितले की, त्यांची तब्येत खराब झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे ठरवले. पण रुग्णवाहिकाच उपलब्ध होत नव्हती. अनेक प्रयत्नानंतर आम्हाला रुग्णवाहिका मिळाली. पण रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हता. तसेच ऑक्सिजन सिलेंडर देखील उपलब्ध नव्हते. माझ्या वडिलांना वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचे प्राण वाचले असते.
बाबा सहगल सध्या हैद्राबाद मध्ये असून वडिलांचे कोरोनाने निधन झाल्याने त्याला वडिलांचे अंतिमदर्शन देखील घेता आले नाही.