अभिनेता आयुषमान खुराणा (Ayushmann Khurrana) उत्तम अभिनेते तर आहेच, पण तो सामाजिक कार्यातही खूप सक्रिय आहे. आपल्या कामातून तो कायम लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करतो. तो भारतात यूनिसेफचा सदिच्छा दूत म्हणू काम करतो. आता आयुषमान याने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) साथ दिली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सुरक्षेसंदर्भातील (Cyber Safety) जनजागृती उपक्रमाचा आयुषमान चेहरा बनला आहे.
मुंबई पोलिसांच्या या मोहिमेचा उद्देश सायबर गुन्ह्यांबद्दल जनजागृती निर्माण करणे आणि नागरिकांना सायबर फसवणुकीबद्दल माहिती देणे हा आहे. बहुतेक वेळा सामान्य नागरिकच सायबर गुन्ह्यांचे बळी ठरतात. कारण त्यांना या गुन्हेगारांच्या आधुनिक पद्धतींची पुरेशी माहिती नसते. यासाठीच आयुष्माने ऑनलाइन सतर्क राहण्याचे आणि सायबर फसवणुकीपासून बचाव कसा करावा, याचे काही उपाय सांगितले आहेत. याबाबत आयुषमानने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.
सायबर सुरक्षेबाबत आयुषमान म्हणतो, "आजच्या काळात सायबर सुरक्षेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे. ऑनलाइन फसवणूक व स्कॅम्सचा धुमाकूळ पाहता, प्रत्येकाने सतर्क व जागरूक राहणं गरजेचं आहे. मुंबई पोलिसांसोबत मिळून काम करणं ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. त्यांनी नेहमीच मुंबईकरांचं रक्षण केलं आहे आणि आता सायबर सुरक्षेच्या दिशेनेही महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. मुंबई पोलिसांनी सुरू केलेली हेल्पलाईन आणि जनजागृती मोहिम लोकांना सजग बनवण्यासाठी एक मोठं पाऊल आहे".
आयुषमान खुराणाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'थामा' चित्रपटात दिसणार आहे. २०२४ मध्ये दिवाळीच्या मुहुर्तावर सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. 'थामा' सिनेमा यावर्षी अर्थात २०२५ मध्ये 'थामा' रिलीज होणार आहे. 'स्त्री', 'भेडीया', 'मुंज्या', 'स्त्री २' नंतर 'थामा' सिनेमा या हॉरर युनिव्हर्सचा पुढील भाग असणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.