Join us

ड्रीम गर्ल 2 ट्रेलर रिलीज झाल्यापासून आयुषमानला येतायेत सतत कॉल आणि मेसेज, अभिनेता म्हणाला- माझा हा अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 15:50 IST

अभिनेता आयुषमान खुराना त्याच्या आगामी 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना त्याच्या आगामी 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. 'ड्रीम गर्ल २' या सिनेमात आयुषमान मुख्य भूमिकेत आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्लचा हा सीक्वेल आहे. या चित्रपटात आयुषमान दुहेरी भूमिकेत आहे. आयुषमान या चित्रपटात स्त्री व्यक्तिरेखा साकारतानाही दिसणार आहे.

याविषयी बोलताना आयुषमान खुराना सांगतो, “ड्रीम गर्ल तर ब्लॉकबस्टर ठरला. पहिल्या भागामुळे आता सिक्वेलकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ड्रीम गर्ल 2’चा ट्रेलर लोकांना वेड लावतोय हे बघून आनंद वाटतो. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर पूजाच्या भूमिकेत आयुषमानला पाहून त्याचे मित्र आणि कुटुंबियांकडून सतत कॉल आणि मेसेज येत असतात असे ही त्याने सांगितलंय पुढे तो म्हणाला , "ड्रीम गर्ल 2 हा सिनेमा प्रत्येकाला धमाल वाटतोय. आम्ही वचन देतो की लोकांचं भरपूर मनोरंजन होईल. मी सिनेमात साकारलेली पूजा लोकांच्या पसंतीस उतरली हे पाहून मला समाधान वाटत आहे! एखाद्या मुलीची वेषभूषा करून सगळा गोंधळ उडवणाऱ्या व्यक्तीची भूमिका करणं माझ्यासाठी आव्हानात्मक होते.. माझा हा अवतार लोकांना आवडतो याचा मला खरोखर आनंद वाटतो. प्रेक्षकांना हसवणं एवढं सोप नसतं. हा सिनेमा प्रेक्षकांना निराळा अनुभव देणारा आहे.”

 आयुषमान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल २'बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. हा चित्रपट २५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, अभिषेक बॅनर्जी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :आयुषमान खुराणा