Join us

त्यांनी माझ्या आईला सोडणं योग्य नव्हतं, पण...! वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर पहिल्यांदा बोलला अर्जुन कपूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 19:17 IST

अर्जुनने कधीच श्रीदेवींना आई म्हणून स्वीकारले नव्हते. पण श्रीदेवींच्या मृत्यूनंतर अर्जुन वडिलांच्या आणि जान्हवी व खुशी या सावत्र बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा झाला.

ठळक मुद्देमी चांगला मुलगा बनावं, ही आईची एकच इच्छा होती. तिच्या या इच्छेनुरूप मी एक चांगला मुलगा बनण्याचा प्रयत्न करतो. कारण हीच एक गोष्ट तिला माझ्याकडून हवी होती, असेही अर्जुन या मुलाखतीत म्हणाला.

बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता बोनी कपूर (Boney kapoor) यांनी 1983 मध्ये मोना शौरीसोबत (Mona Shourie) लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर दोनच वर्षांत बोनी व मोना यांचा पहिला मुलगा अर्जुनचा जन्म झाला आणि नंतर पाच वर्षांनी अंशुला जन्मली. पण अर्जुन कपूर (Arjun Kapoor) उणापुरा 11 वर्षांचा झाला असेल नसेल तेव्हा त्याच्या आईबाबाचा घटस्फोट झाला. मोना व बोनी यांचा संसार मोडला आणि त्याचवर्षी बोनी यांनी सुपरस्टार श्रीदेवींसोबत (Sridevi)   लग्नगाठ बांधली. आज अर्जुनची आई या जगात नाही. परंतु आईच्या आठवणीशिवाय अर्जुनचा एक दिवसही जात नाही. अर्जुनने कधीच श्रीदेवींना आई म्हणून स्वीकारले नव्हते. पण श्रीदेवींच्या मृत्यूनंतर अर्जुन वडिलांच्या आणि जान्हवी व खुशी या सावत्र बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा झाला.आजपर्यंत कधीही अर्जुन कपूर वडिलांच्या दुस-या लग्नाबद्दल बोलला नव्हता. मात्र एका ताज्या मुलाखतीत तो पहिल्यांदा यावर बोलला. ‘फिल्म कम्पेनियन’ला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने त्याच्या व त्याच्या वडिलांच्या नात्याचे अनेक पैलू उघड केलेत.

वडिलांनी जे केले ते ठीक होते, असे म्हणणार नाही़...प्रेम ही भावनाच मुळात कॉम्प्लिकेटेड आहे़ एखाद्या व्यक्तिवर प्रेम करत असतानाच तुम्ही दुस-या व्यक्तिच्याही प्रेमात पडू शकता. हे शक्य आहे. प्रेमात असताना लोक अनेक टप्प्यातून जातात. माझ्या वडिलांनी जे केले ते योग्य होते, असे मी म्हणणार नाही. माझ्यासाठी ते चुकीचंच होतं. कारण मी त्यांचा मुलगा होतो आणि त्या वयात त्यांच्या निर्णयाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला होता. त्यामुळे ठीक आहे, असं होतं, असे मी म्हणू शकणार नाही. पण आज मोठा झाल्यावर त्या गोष्टी समजू शकतो, असे अर्जुन म्हणाला.

मी वडिलांचा आदर करतो पण...माझ्या आईने दिलेले संस्कार नेहमी माझ्यासोबत असतील. काहीही होवो, कशीही परिस्थिती येवो पण नेहमी वडिलांसोबत राहा, असे मला आईने सांगितले होते. पापांनी जो काही निर्णय घेतला, तो प्रेमात घेतला, असे तिने मला सांगितले होते. मी आजही वडिलांचा आदर करतो. त्यांना दुस-यांदा प्रेम झाले, त्या प्रेमाचा मी आदर करतो. पण प्रेम मुळातच खूप जटील गोष्ट आहे. प्रेम एकदाच होतं, असं म्हणणं आज मूर्खपणा ठरेल, असेही तो म्हणाला.

आईची एकच इच्छा होती...मी चांगला मुलगा बनावं, ही आईची एकच इच्छा होती. तिच्या या इच्छेनुरूप मी एक चांगला मुलगा बनण्याचा प्रयत्न करतो. कारण हीच एक गोष्ट तिला माझ्याकडून हवी होती, असेही अर्जुन या मुलाखतीत म्हणाला.  

टॅग्स :अर्जुन कपूरबोनी कपूरश्रीदेवी