अर्चना पूरन सिंग आणि परमीत सेठी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल. १९९२ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांना दोन मुलंदेखील आहेत. पण, परमीत यांच्या अभिनेता बनण्याच्या निर्णयावर अर्चना खूश नव्हती. त्यामुळेच अभिनेत्रीने पतीला टोमणेही मारले होते. याशिवाय अर्चना परमीतला ओरडायची असा खुलासा अभिनेत्याने नुकताच केला आहे.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत परमीत म्हणाला, "मी दोन वेळा बिजनेस करायचा प्रयत्न केला. पण, दोन्ही वेळेस मला यश आलं नाही. माझ्याकडे दुसरं काही करण्यासारखं उरलंच नव्हतं. त्यामुळेच अपयशी झाल्यानंतर काय करायचं ते मला कळत नव्हतं. अभिनयात करिअर करण्याच्या माझ्या निर्णयाला अर्चनाचा विरोध होता. तिचं म्हणणं होतं की हे तू नको करूस. यात खूप स्ट्रगल आहे. पण, मी तिला म्हटलं होतं की जर मी यात अपयशी ठरलो तर त्याला जबाबदार मीच असेन. बिजनेसमध्ये दुसऱ्या काही गोष्टींमुळे मला अपयश आलं. पण, मला वाटत होतं की मी अभिनय करू शकेन. म्हणून मी तिला म्हणायचो की मी हे करू शकेन".
"अर्चना खूप स्ट्रिक्ट आहे. तिने माझा अपमान केला होता. जेव्हा मी अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा ती माझ्यावर ओरडायची. तू कधीच अभिनेता होऊ शकणार नाहीस. तुला तर स्माइलही करता येत नाही. जेव्हा ती माझा अपमान करायची तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी असायचं. पण, मी हट्टी होतो. मी स्वत:वर खूप मेहनत घेतली. सुरुवातीला मला चांगला अभिनय येत नव्हता. पण, नंतर मी त्यातील स्किल्स शिकलो", असंही परमीतने पुढे सांगितलं.