Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अनुष्का शंकर व जो राईट विभक्त! विवाह संपुष्टात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 14:15 IST

जगप्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर यांची मुलगी आणि ख्यातिप्राप्त संगीतकार अनुष्का शंकर हिचे पती जो राईटसोबतचे नाते संपुष्टात आले आहे. ...

जगप्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर यांची मुलगी आणि ख्यातिप्राप्त संगीतकार अनुष्का शंकर हिचे पती जो राईटसोबतचे नाते संपुष्टात आले आहे. होय, जोच्या प्रतिनिधीने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. अनुष्का शंकर व जो राईट यांचे नाते संपुष्टात आले आहे. तथापि मुलांचे संगोपन आणि त्यांचा आनंद  यासाठी अनुष्का व जो कटिबद्ध असतील, असे या प्रतिनिधीने स्पष्ट केले आहे.अनुष्का व जो या दोघांनी सप्टेंबर २०१० मध्ये लंडन येथे लग्न केले होते. २००९ मध्ये  विलियम डलरिम्पल यांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी या दोघांची भेट झाली होती. यानंतर जगभर या सेलिब्रिटी कपलच्या रिलेशनशिपची चर्चा झाली होती. जो हा एक नामवंत ब्रिटीश दिग्दर्शक आहे. ‘प्राईड अ‍ॅण्ड प्रेज्युडिस’ आणि ‘अटॉन्मेंट’ यासारखे सिनेमे जो याने बनवले आहेत. ‘इंडियन समर’ या आपल्या चित्रपटासाठी जो भारतात आला होता. या चित्रपटासाठी माझे आॅडिशन झाले आणि मला इंदिरा गांधी यांची भूमिका आॅफर केली गेली होती, असे यादरम्यान अनुष्काने सांगितले होते. अर्थात हा चित्रपट पुढे बारगळला पण जो व अनुष्का मात्र यानिमित्ताने चांगलेच जवळ आलेत. वर्षभरातच दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतले. या दोघांना जुबिन आणि मोहन अशी दोन मुले आहेत.अलीकडे आंतरराष्ट्रीय मीडियासमोर या कपलने त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली होती. यासंदर्भात अनुष्काशी संपर्क साधला असता, तिने यावर बोलण्यास नकार दिला होता.अनुष्काने वयाच्या नवव्या वषार्पासून आपले वडील रविशंकर यांच्याकडे सतारवादनाचे धडे घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी तिने सतारवादनाचा आपला पहिला कार्यक्रम सादर केला होता. तिच्या राईज  या संगीतसंग्रहाला ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.