Join us

‘अंजूला सगळं मिळालं आता फक्त आॅस्कर हवा’, नाशिकगर्ल अंजली पाटीलच्या आईची भावना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 14:13 IST

‘मी सारखी म्हणायची, आमच्या अंजूला सगळं मिळालं, आता फक्त आॅस्करपर्यंत जायचं राहिलं आहे. आज तोही क्षण आला. तिने खूप ...

‘मी सारखी म्हणायची, आमच्या अंजूला सगळं मिळालं, आता फक्त आॅस्करपर्यंत जायचं राहिलं आहे. आज तोही क्षण आला. तिने खूप कमी वेळेत म्हणजेच केवळ पाच वर्षांत ही मजल मारली आहे. आम्हा आई-वडिलांना आणि नाशिककरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. तिचे हे यश बघून होळे भरून आले, अशी भावना ‘न्यूटन’गर्ल अंजली पाटीलची आई शुभा पाटील यांनी व्यक्त केली. जेव्हा ‘न्यूटन’ची आॅस्करसाठी निवड झाल्याची बातमी त्यांना समजली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आनंदाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी ‘मुलीशी आज दुपारीच बोलणे झाले’ असे म्हणत तिच्या यशस्वीतेचा प्रवास सांगण्यास सुरुवात केली. नाशिकगर्ल म्हणून ओळखली जाणारी अंजली पाटील नाशिकरोड परिसरात राहाते. पुणे विद्यापीठातून परफॉर्मिंग आट्सची पदवी घेतल्यानंतर तिने दिल्लीतील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामधून अजून एक पद्वी घेतली. तिथे तिने सुवर्ण पदक मिळविल्याने त्याचा चित्रपट प्रवास लगेचच सुरू झाला. हिंदी, मराठी इंग्लिशसह तिने तामिळ, कन्नड, मल्याळम, सिंहिली अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले. केवळ सातच वर्षांच्या तिच्या आतापर्यंतच्या प्रवासात तिने १६ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील पाच चित्रपटांमध्ये तिने याच वर्षात काम केले. त्यातीलच एक चित्रपट ‘न्यूटन’ हा आहे. खरं तर अंजलीने विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करताना तिच्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. याची दखल म्हणून तिच्या ‘बंगरूतल्ली’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला राष्टÑीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. आपल्या मुलीचे हे यश बघून तिच्या परिवारामध्ये नेहमीच तिचे कौतुक केले जात होते. तिची आई शुभा पाटील या नेहमीच म्हणायच्या की, ‘आमच्या अंजूला सर्व काही मिळालं आता फक्त आॅस्कर मिळायला हवा’ आता तेही स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने अंजलीने पुढे पाऊल टाकले आहे. मराठमोळा आणि प्रयोगशील दिग्दर्शक अमित मसूरकर यांच्या ‘न्यूटन’मध्ये अंजलीसोबत राजकुमार राव याची प्रमुख भूमिका आहे. ‘न्यूटन’ची आॅस्करसाठी निवड केल्याने बॉलिवूडमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या चित्रपटाने तमाम भारतीयांचे आॅस्करचे स्वप्न पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.