‘भाड्याचा सूट घालून लग्नात जायचा अनिल कपूर’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 17:23 IST
बॉलिवूडचा बॅडमॅन अर्थात गुलशन ग्रोवर म्हणजे अगदी परखड, मनात येईल ते बोलणारा अभिनेता. पण हे काय? अगदी बिनधास्त वागण्या-बोलण्याच्या ...
‘भाड्याचा सूट घालून लग्नात जायचा अनिल कपूर’
बॉलिवूडचा बॅडमॅन अर्थात गुलशन ग्रोवर म्हणजे अगदी परखड, मनात येईल ते बोलणारा अभिनेता. पण हे काय? अगदी बिनधास्त वागण्या-बोलण्याच्या नादात गुलशन ग्रोवरने अनिल कपूरची चांगलीच ‘पोलखोल’ केली. एकंदर काय तर, गुलशन अनिल कपूरसाठी खरोखरच ‘बॅडमॅन’ ठरला. निमित्त होते, ‘राम लखन’ या चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाल्याचे. यानिमित्त ‘राम लखन’चे दिग्दर्शक सुभाष घई यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत गुलशन ग्रोवर आणि अनिल कपूर दोघेही होते. याच पार्टीत गुलशनने एक किस्सा सगळ्यांशी शेअर केला. बॉलिवूडमधील संघर्षाच्या काळात अनिल कपूर भाड्याचा सूट घालून लग्नात व मोठ्या कार्यक्रमांना जायचा, असे गुलशनने सांगितले. गुलशनचे हे वाक्य ऐकले अन् पार्टीतला प्रत्येकजण पोट धरून हसू लागला. यानंतर तर गुलशनने हा किस्सा अगदीच रंगवून सांगितला. गुलशनने सांगितले की, एकदा मला आणि अनिल दोघांनाही राजीव मेहरा यांच्या लग्नाला जायचे होते. या लग्नाचे पाच वेगवेगळे फंक्शन होते. प्रत्येक फंक्शनसाठी वेगवेगळे कपडे तर लागणारच. पण आमच्याजवळ ते घ्यायला पैसे नव्हते. मग काय, आम्ही अकबर नावाच्या एका ड्रेसवाल्याला गाठले. त्याने आम्हाला प्रत्येक फंक्शनसाठी भाड्याने वेगवेगळे आणि महागडे सूट दिले. आता अशावेळी अनिल थोडीच चूप राहणार होता. अनिलही बोलला. मी संजय दत्तचा सूटही घालायचो. पण मला तो फिट यायचा नाही. मी संजयला सूट मागायचो नाही तर त्याच्या डिझाईनरला मागायचो. ‘कर्मा’च्या प्रीमिअरला मी घातलेला सूटही भाड्याचा होता, असे अनिलने सांगितले. संघर्षाच्या काळात संगीतकार लक्ष्मीकांत व प्यारेलाल यांनी माझी खूप मदत केली. मी अनेक दिवस त्यांच्या घरी राहिलो, हे सांगायलाही तो विसरला नाही.