अमिताभ बच्चन यांच्या या नायिकेचा झाला होता अपघातात मृत्यू, निधन होऊन आज झाली १४ वर्षं पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 16:15 IST
अभिनेत्री सौंदर्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले होते. तिच्या भूमिकांचे नेहमीच कौतुक करण्यात आले. सौंदर्या दक्षिणेतील एक प्रसिद्ध अभिनेत्री ...
अमिताभ बच्चन यांच्या या नायिकेचा झाला होता अपघातात मृत्यू, निधन होऊन आज झाली १४ वर्षं पूर्ण
अभिनेत्री सौंदर्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले होते. तिच्या भूमिकांचे नेहमीच कौतुक करण्यात आले. सौंदर्या दक्षिणेतील एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिला बॉलिवूडमध्ये तितकीशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. १९९९ पर्यंत तर सौंदर्या नावाची कोणी दाक्षिणात्य अभिनेत्री आहे हे देखील अनेकांना माहीत नव्हते. पण १९९९ साली प्रदर्शित झालेल्या सूर्यवंशम या चित्रपटाने सौंदर्याला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटामुळे तिची फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड वाढली. सुर्यवंशम या चित्रपटात अमिताभ यांनी ठाकूर भानूप्रताप आणि हिरा अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. हिरा या व्यक्तिरेखेच्या नायिकेच्या भूमिकेत सौंदर्याला प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. तिचा अभिनय, तिचे सौंदर्य याची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. सौंदर्याला हिंदी येत नसल्याने तिच्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांनी डबिंग केले होते. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटानंतर सौंदर्या कोणत्या बॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार अशी तिच्या फॅन्सना उत्सुकता लागली होती. पण या चित्रपटाच्या केवळ पाच वर्षांनंतर सौंदर्याचे निधन झाले. सौंदर्या १७ एप्रिलला भारतीय जनता पार्टी आणि तेलुगू देसम पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी करिमनगर येथे एअरक्राफ्टने जात होती. फोर सीटर प्रायवेट एअरक्राफ्टने बंगळुरूच्या जक्कुर एअरफिल्ड येथून तिच्या एअरक्राफ्टने उड्डाण केल्यानंतर १०० फूट वरती जाताच तिचे एअरक्राफ्ट क्रॅश झाले होते. एअरक्राफ्टमध्ये सौंदर्यासोबतच तिचा भाऊ अमरनाथ, हिंदू जागरण समितीचे सेक्रेटरी रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप होते. त्या दुर्घटनेत या चौघांचाही मृत्यू झाला. त्यावेळी सौंदर्या केवळ ३१ वर्षांची होती. हा अपघात इतका भीषण होता की, तिच्या घरच्यांना तिचे शव देखील मिळाले नव्हते. मृत्यूच्या केवळ वर्षभराअगोदर सौंदर्याने सॉफ्टवेअर इंजिनीअर जी. एस. रघूसोबत प्रेमविवाह केला होता. सौंदर्याचा अपघात झाला त्यावेळी ती गर्भवती होती. १८ जुलै १९७२ला जन्मलेल्या सौंदर्याने १९९२ साली तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिचे वडील एस. नारायण हे एक बिझनेसमन आणि कन्नड चित्रपटांचे लेखक होते. Also Read : अमिताभ बच्चन यांच्या नावाने हिंदू-मुस्लिमांच्या भावना भडकविणारा मॅसेज होतोय व्हायरल, पण काय आहे सत्य?