बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. नुकतेच त्यांनी दिल्लीतील गुरूद्वारा रकब गंज साहिब येथे कोरोना केअर सेंटर उभारण्यासाठी २ कोटींची मदत केली होती. सुरुवातीला त्यांच्याकडून ही मदत घेण्यास अनेकांनी नकार दिला होता. कारण त्यांच्यावर १९८४ साली राजीव गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीला चिथावणी दिल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र अमिताभ बच्चन यांनी दहा वर्षांपूर्वी या संपूर्ण प्रकरणावर पत्र लिहून त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. आता बिग बींचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी २०११ साली अकाल तख्त साहिबच्या जत्थेदारांना हे पत्र पाठवले होते. यामध्ये त्यांनी त्यांच्यावर केले जाणारे आरोप फेटाळून लावले होते. त्यात त्यांनी लिहिले होते की, मी कधीही राजीव गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीलाला पाठिंबा दिला नाही. मी कोणाच्याही विरोधात भडकाऊ भाषणे केली नाहीत. कदाचित तुम्हाला कोणीतरी चूकीची माहिती दिली किंवा तुमचा गैरसमज झाला आहे. हे पत्र मुंबईत राहणाऱ्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे सदस्य गुरिंदरसिंग बावा यांच्यामार्फत पाठवण्यात आले होते.