Join us

"युद्धात समोर शत्रूला पाहताच भित्रे लोक..." अमिताभ बच्चन यांचे एकानंतर एक ट्विट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 17:37 IST

अमिताभ बच्चन यांचे ट्विट व्हायरल होत आहेत.

Amitabh Bachchan: जम्मू काश्मीरमधील पाहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे प्राण गेले. त्यानंतर भारत सरकारने ७ मे रोजी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत अचूक हल्ले करून प्रत्युत्तर दिलं. या कारवाईनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे आता युद्धविराम लागू झाला. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची माहिती भारताच्या लष्करानं पुराव्यांसह दिली. पण, पाकिस्तानकडून भ्रामक दावे करण्यात येत आहे. पाकिस्तानी नागरिक हे 'पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय' असं म्हणताना दिसून येत आहेत. अशातच आता महानायक अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमधील ओळी सध्याच्या परिस्थितीला तंतोतंत लागू होत असल्याचं चाहते म्हणत आहेत. 

बिग बींनी रविवारी आपल्या सोशल मीडिया हँडलवर तुलसीदास रामचरित मानसमधील एक ओळ शेअर केली आहे. ज्यामध्ये शौर्य आणि शत्रू या दोघांबद्दल लिहिलं आहे. ते म्हणाले, "योद्धे युद्धात आपले शौर्य दाखवतात, ते तोंडाने स्वतःची स्तुती करत नाहीत. युद्धात समोर शत्रू दिसताच भित्रे लोक स्व:ताच्या शौर्याचा अभिमान बाळगतात". ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर त्यांचे अनेक चाहते कमेंटही करत आहेत.

याशिवाय पोस्टच्या शेवटी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वडिलांनी १९६५ साली भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या कवितेचा उल्लेख करत लिहिलं, "हे शब्द आज अधिकच परिणामकारक ठरत आहेत. बाबूजींच्या कवितेतील ती दृष्टी आजही तितकीच सजीव आहे. त्यांनी नमूद केलं की, "१९६८ साली हरिवंशराय बच्चन यांना लेखनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हे जवळपास ६० वर्षांपूर्वीचं, पण आजच्या वास्तवाशी तितकंच सुसंगत आहे".

हरिवंशराय बच्चन यांची कविता...

आमिताभ यांनी भारत आणि पाकिस्तान युद्धावर वडील हरिवंशराय बच्चन यांच्या काही कवितेच्या ओळी शेअर केल्या. बिग बी लिहितात की, "हे पूर्णतः योग्य आहे. काळाच्या कसोटीवर उतरलेल्या, प्रसिद्ध, शूरवीर जन्मदात्री, सदैव धाडसी आणि अभिमानी भूमीकडून नेहमी हेच अपेक्षित असते, की जेव्हा कोणी आपल्याला आव्हान देते, कोणी आपल्याला भडकवते, तेव्हा तेव्हा हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून सागराच्या किनाऱ्यापर्यंत अशी गर्जना व्हावी की पृथ्वी हादरून जावी आणि आकाशातसुद्धा भेगा पडाव्यात"

टॅग्स :अमिताभ बच्चनयुद्धपाकिस्तानऑपरेशन सिंदूर