पहलगाम हल्ल्यानंतर (pahalgam attack) भारताला मोठा धक्का बसला. यात काही निष्पाप लोकांचा बळी गेला. नंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (operation sindoor) राबवत पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. गेल्या तीन-चार दिवसांपासून भारत-पाकिस्तान बॉर्डरवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व काळात अनेक सेलिब्रिटी पोस्ट करत भारताला पाठिंबा देत आहेत. परंतु बिग बी अर्थात अमिताभ बच्चन मात्र या संपूर्ण प्रकरणावर काहीच बोलले नाहीत. अखेर १९ दिवसांनंतर अमिताभ यांनी ट्विटरवर पोस्ट करुन मौन सोडलंय.
बिग बी यांची पोस्ट चर्चेत
अमिताभ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहेच शिवाय त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या काही कवितेच्या ओळी लिहिल्या आहेत. बिग बी लिहितात की, "सुट्टी साजरी करताना, त्या राक्षसाने निष्पाप जोडप्याला बाहेर ओढले, पतीला नग्न केले आणि त्याचे कर्तव्य पार पाडल्यानंतर, त्याच्यावर गोळीबार सुरू केला. पत्नीने गुडघे टेकून पतीला मारू नका अशी विनंती केल्यानंतरही, त्या भित्र्या राक्षसाने तिच्या पतीला अतिशय निर्दयीपणे गोळ्या घातल्या आणि पत्नीला विधवा बनवले. जेव्हा पत्नी म्हणाली, मलाही मारून टाका. तेव्हा तो राक्षस म्हणाला, नाही, तू जाऊन सांग '....'.
मला मुलीच्या मानसिक स्थितीवर पूज्य बाबूजींच्या कवितेतील एक ओळ आठवली. जणू काही ती मुलगी ‘....’ कडे गेली आणि म्हणाली, ‘चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे’.. (बाबूजींच्या ओळी) यानंतर “....” त्याने तिला सिंदूर दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’ जय हिंद जय हिंदची सेना....तू कधीच थांबणार नाहीस, कधीच मागे हटणार नाहीस, कधीच झुकणार नाहीस. शपथ घ्या, शपथ घ्या, शपथ घ्या अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ."