Join us
Daily Top 2Weekly Top 5

"इंटरनेटचं वादळ अन् सत्य..."; समय रैनाच्या टीकेनंतर बिग बींचं ब्लॉगमधून उत्तर? नेटकऱ्यांमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 14:48 IST

समय रैनाने त्याच्या शोमध्ये अमिताभ बच्चन यांना उद्देशून अनेक जोक्स केले.

प्रसिद्ध कॉमेडियन समय रैना 'इंडियाज गॉट टॅलेंट' च्या वादानंतर जवळपास वर्षभरानंतर पुन्हा चाहत्यांसमोर आला आहे. नुकतंच त्याने 'स्टील अलाईव्ह'हा शो केला. यामध्ये त्याने चाहत्यांना हसवलं आणि तितकंच रडवलं. गेल्या वर्षभरात त्याने काय काय सहन केलं हे त्याने मजेशीर अंदाजात कधी हसवत कधी रडवत सांगितलं. या शोमध्ये समय रैनाने महानायक अमिताभ बच्चन यांचीही खिल्ली उडवली. आता अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून समयलाच अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं आहे.

 अमिताभ बच्चन ट्विटरवर अॅक्टिव्ह असतातच मात्र ते नियमितपणे ब्लॉगही लिहितात. यात ते अगदी वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींवर अप्रत्यक्षरित्या अगदी सविस्तर लिहितात. आता त्यांनी त्यांच्या ताज्या ब्लॉगमध्ये 'इंटरनेटचे वादळ' आणि 'सत्या'वर भाष्य केले आहे. त्यांनी लिहिले की, "दररोज नवीन विचार आणि कल्पना येतात, पण एकाच वेळी सर्व काही साध्य करणे कठीण असते. इंटरनेटचे वादळ इतक्या वेगाने चालते की ते तुमचे लक्ष अनेक पैलूंकडे वेधून घेते, ज्यामुळे 'खरी गोष्ट' आणि 'सत्य' काय आहे हे ठरवणे कठीण होते." बिग बींच्या या शब्दांचा रोख अप्रत्यक्षपणे समय रैनाने केलेल्या विनोदावर आणि त्यानंतर निर्माण झालेल्या वादावर असल्याचे बोलले जात आहे.

आपल्या ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी 'वेळ' आणि 'पिढीतील अंतर' यावरही मार्मिक टिप्पणी केली आहे. त्यांनी लिहिले की, "ज्यांनी भूतकाळ अनुभवला आहे, त्यांना त्याचे महत्त्व समजते. आजच्या पिढीसाठी कदाचित ते महत्त्वाचे नसेल, कारण ते सध्याच्या काळात मग्न आहेत." विशेष म्हणजे समय रैनावर टीका करताना अनेकांनी त्याने मर्यादा ओलांडल्याचे म्हटले होते, तर अमिताभ यांनी मात्र अत्यंत संयमित भाषेत त्यांचे विचार मांडले आहेत.

समय रैनाने त्याच्या शोमध्ये अमिताभ यांच्या 'पोलिओ' जाहिरातीचा संदर्भ देत अभिषेक बच्चनवर अत्यंत खालच्या पातळीवर भाष्य केले होते. समय म्हणाला होता की, "सर, तुम्ही पोलिओची इतकी जाहिरात केली, तरी तुमच्या मुलाला स्वतःच्या पायावर उभे करू शकला नाहीत." या विधानामुळे बच्चन प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. एजाज खानने तर संताप व्यक्त करताना म्हटले की, "समय, तू मला कुठे दिसू नकोस, अमिताभ बच्चन साहेबांनी अनेक दशके देशाचे मनोरंजन केले आहे आणि तू त्यांच्या कुटुंबाबद्दल असे बोलतोस? तुझे दिवस आता संपले आहेत."

अमिताभ बच्चन दररोज न चुकून आपला ब्लॉग लिहितात आणि चाहत्यांशी संवाद साधतात. ८३ वर्षांच्या या महानायकाने नेहमीप्रमाणे या वादात स्वतःला गुंतवून न घेता, अतिशय वैचारिक पद्धतीने आपली बाजू मांडली आहे. इंटरनेटच्या काळात माहिती एका बटणावर उपलब्ध असली तरी, मानवी विचार आणि सत्याची पारख करणे किती गरजेचे आहे, हेच त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सुचवले आहे. सध्या ही बातमी आणि बिग बींचा हा ब्लॉग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूड