Join us

शराबी चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी या कारणामुळे लपवला आहे एक हात, पुढे हीच गोष्ट बनली त्यांचे स्टाईल स्टेटमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 17:54 IST

अमिताभ यांच्या शराबी या चित्रपटाला नुकतेच म्हणजेच १८ मे ला ३५ वर्षं पूर्ण झाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश मेहरा यांनी केले होते.

ठळक मुद्देचित्रीकरण करताना एक फटाका माझ्या हातावर पडला होता आणि त्यामुळे माझा हात भाजला होता. पण या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी तारखा आधीच दिल्या असल्याने त्यात बदल करणे शक्य नव्हते. त्यामुळे मी माझा हा हात डाव्या खिशात टाकून चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले.

शराबी हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील अतिशय प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील अमिताभ यांच्या अभिनयाचे आजही कौतुक केले जाते. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात अमिताभ यांनी एका दारुड्याची भूमिका साकारली आहे आणि त्यांच्या खऱ्या आयुष्यात ते दारुला स्पर्श देखील करत नाहीत. 

अमिताभ यांच्या शराबी या चित्रपटाला नुकतेच म्हणजेच १८ मे ला ३५ वर्षं पूर्ण झाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश मेहरा यांनी केले होते. या चित्रपटाला ३५ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमिताभ यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळेचा एक किस्सा नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान माझा एक छोटासा अपघात झाला होता. चित्रीकरण करताना एका फटाका माझ्या हातावर पडला होता आणि त्यामुळे माझा हात चांगलाच भाजला होता. पण या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी तारखा आधीच दिल्या असल्याने त्यात ऐनवेळी बदल करणे शक्य नव्हते. त्यामुळे मी त्याच अवस्थेत काम करण्याचे ठरवले. जखमेमुळे माझा हात पूर्णपणे चिघळला होता. पण मी माझा हा हात डाव्या खिशात टाकून चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. माझ्या हाताला लागल्यामुळे मी ही गोष्ट केल्याचे चित्रपट पाहाताने कोणाच्याच लक्षात आले नाही. पुढे जाऊन हेच माझे स्टाईल स्टेटमेंट बनले.  

शराबी या चित्रपटाच्या संवादांना आजही प्रेक्षक डोक्यावर घेतात. पण हे संवाद चांगले होण्यामागे अमिताभ बच्चन यांनी दिलेला एका सल्ला कारणीभूत आहे. या चित्रपटाचे संवाद खूपच मोठे असल्याचे अमिताभ बच्चन यांना चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या चित्रीकरणाच्या वेळी लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी प्रकाश मेहरा यांना याबाबत सांगितले होते की, चित्रपटात ते दारुड्याच्या भूमिकेत असल्याने त्यांना संवाद बोलायला वेळ लागणार... संवाद मोठे असतील तर चित्रपट उगाचच ताणला जाईल आणि त्यामुळे या चित्रपटाचे संवाद छोटे असावेत आणि त्यांनी देखील अमिताभ यांचा हा सल्ला लक्षात घेऊन संवाद छोटे करण्यास सांगितले.

टॅग्स :अमिताभ बच्चन