बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत. बिग बी कुटुंबासोबत मुंबई येथील 'जलसा' बंगल्यात राहतात. अमिताभ हे दर रविवारी मुंबईतील त्यांच्या 'जलसा' बंगल्याबाहेर येतात आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो चाहत्यांना भेटतात. गेल्या ४० वर्षांपासून 'जलसा'वर हा 'सिलसिला' अखंड सुरु आहे. काल रविवारीही यात खंड पडला नाही. अमिताभ काल रविवारी मुंबईत होते. मग काय, घराबाहेर जमलेल्या चाहत्यांची भेट ते चुकवतील, असे शक्यच नाही. अमिताभ चाहत्यांना भेटायला घराबाहेर आलेत आणि तेही सोबत एक सरप्राईज घेऊन आलेत.
अमिताभ बच्चन आणि त्यांच्या चाहत्यांमधील नाते खूप खास आहे. काल पाऊस सुरू असतानाही चाहते अमिताभ यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्याबाहेर जमा झाले होते. काल त्यांनी बंगल्याबाहेर येत नेहमीप्रमाणे चाहत्यांच्या गर्दीला अभिवादन केले. त्यांचे हात जोडून स्वागत केले. यावेळी, त्यांच्या हातात दोन वेगळ्याच गोष्टी दिसल्या, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना हेल्मेट आणि दांडिया या दोन गोष्टी भेट म्हणून दिल्या. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ते चाहत्यांना हेल्मेट आणि दांडिया देताना दिसले.
अमिताभ बच्चन यांच्या या कृतीमधून त्यांनी आपल्या चाहत्यांना सुरक्षिततेचा संदेश दिला. हेल्मेट भेट म्हणून देत त्यांनी रस्ते सुरक्षेबद्दल जागरुकता वाढवली. तर नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी दांडियादेखील भेट म्हणून दिल्या. अमिताभ बच्चन यांच्या या कृतीतून त्यांचं चाहत्यांबद्दल असलेले प्रेम आणि काळजी दिसून आली.
दरम्यान, अमिताभ बच्चन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतात. अनेक वेळा ते सामाजिक, राजकीय विषयांवर त्यांचं मत व्यक्त करत असतात. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता केवळ पडद्यावरच नाही तर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसून येतं. अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते अलिकडेच 'Kalki 2898 AD' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. याशिवाय 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय शोचं ते सध्या सुत्रसंचालन करत आहेत.