अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) सध्या बॉलिवूडमध्ये सर्वात आघाडीवर आहे. तिने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत. अतिशय कमी वयात तिने हे यश मिळवलं. दोन वर्षांपूर्वी आलियाला 'गंगूबाई काठियावाडी'साठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. आलिया भटच्या टॅलेंटचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आता आलियाच्या आगामी सिनेमांची चर्चा आहे. ती यशराज फिल्म्सच्या 'अल्फा' सिनेमा अॅक्शन करताना दिसणार आहे. याशिवाय आलिया आणखी एका सिनेमाच्या तयारित आहे. कोणता आहे तो सिनेमा?
आलिया भट करिअरमध्ये काही ना काही नवीन करत असते. तिच्या सर्जनशीलतेची दाद दिली जाते. 'इटर्नल सनशाईन' ही तिची स्वत:ची निर्मिती कंपनी आहे. याअंतर्गत तिने 'डार्लिंग','जिगरा' असे सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पीपिंगमून.कॉम नुसार, आलिया भट नव्या सिनेमाच्या तयारीला लागली आहे. हा सिनेमा रणबीर कपूरच्या 'वेक अप सिड'सारखाच असणार आहे. मात्र यात फिमेल लीड असणार आहे. इंडियन कॉलेज ड्रामावर आधारित हा सिनेमा असणार आहे. यात जास्त करुन नवीन कलाकार दिसतील. येत्या ऑक्टोबरपासून सिनेमाचं शूट सुरु होणार आहे. आलिया भटने या सिनेमासाठी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओशी हातमिळवणी केली आहे. याआधी तिने निर्मित केलेला 'पोचर' सिनेमा प्राईमवरच रिलीज झाला होता.
आलिया भट शेवटची 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात दिसली. सध्या ती संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र आहे. यात तिच्यासोबत रणबीर कपूर, विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय आगामी 'अल्फा' या महत्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये तिच्यासोबत शर्वरी वाघ दिसणार आहे. बॉबी देओलचीही यामध्ये भूमिका आहे.