बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटची माजी पर्सनल असिस्टंट (PA) वेदिका प्रकाश शेट्टी हिला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. वेदिकावर आलियाची प्रोडक्शन कंपनी Eternal Sunshine Productions Pvt Ltd आणि तिच्या पर्सनल अकाऊंटमधून तब्बल ७६,९०,८९२ चा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप आहे. मे २०२२ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान ही फसवणूक करण्यात आली.
आलियाची आई आणि प्रोडक्शन हाऊसच्या संचालक सोनी राजदान यांनी २३ जानेवारी २०२५ रोजी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तेव्हा हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदिका शेट्टीने २०२१ मध्ये आलिया भटची पर्सनल असिस्टंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि २०२४ पर्यंत या पदावर राहिली. या काळात तिला आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक अधिकार देण्यात आले होते.
पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, वेदिकाने बनावट बिलं बनवली आणि आलियाला त्यावर स्वाक्षरी करायला लावली. हे खर्च आलियाच्या प्रवास, मीटिंग्स आणि इतर कार्यक्रमांशी संबंधित आहेत असं खोटं सांगून ती अभिनेत्रीची सतत दिशाभूल करायची. तिने ऑनलाईन टूल्सचा वापर करून प्रोफेशनलपणे ही बिलं डिझाईन केली, जेणेकरून ती खरी वाटतील. आलियाने या बिलांवर स्वाक्षरी केल्यानंतर, संबंधित रक्कम एका जवळच्या मित्राच्या खात्यात ट्रान्सफर केली जायची.
मित्र नंतर सर्व पैसे वेदिकाला परत करायचा. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर, वेदिका शेट्टी फरार झाली आणि सतत तिचं लोकेशन बदलत राहिली. ती सर्वात आधी राजस्थान, नंतर कर्नाटकमध्ये, नंतर पुणे आणि शेवटी बंगळुरूला पोहोचली. जुहू पोलीस पथकाने तिला बंगळुरूहून तिला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.