बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटची माजी पर्सनल असिस्टंट (PA) वेदिका प्रकाश शेट्टीला पोलिसांनी अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे. तिने अभिनेत्रीची तब्बल ७७ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अभिनेत्रीची आई सोनी राजदान यांनी वेदिकाविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली होती. पोलीस तपासात आता वेदिकाबद्दल अनेक नवीन धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
फसवणुकीचा तपास करणाऱ्या जुहू पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आलियाच्या माजी पर्सनल असिस्टंटने प्रॉडक्शन हाऊस इटरनल सनशाइन प्रॉडक्शनशी संबंधित गोपनीय माहिती एका अज्ञात अमेरिकन रहिवाशाला लीक केल्याचा आरोप आहे. वेगवेगळे लोक आणि कंपन्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करून आलियाची ७७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. २०२१ ते २०२४ पर्यंत आलियाची असिस्टंट म्हणून काम करणारी वेदिका शेट्टी डिसेंबर २०२३ मध्ये अमेरिकेत राहणाऱ्या शिवसाई तेजा नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली. त्यानंतर तिने व्हॉट्सअॅपद्वारे इटरनल सनशाइन प्रॉडक्शनशी संबंधित अनेक गोपनीय माहिती त्या व्यक्तीशी शेअर केली.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शिवसाई तेजाबद्दल अधिक माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो वेदिकाच्या संपर्कात कसा आला हे शोधले जात आहे. २ मे २०२२ ते २२ मार्च २०२४ दरम्यान वेदिकाने आलियाच्या खात्यातून अनेक लोक आणि कंपन्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर केल्याचंही तपासात समोर आलं आहे. ज्यामध्ये सात्विक साहूला ४३ लाख रुपये, सिमी जॉनच्या खात्यात ५७,०००, शशांक पांडेला ७७,०००, चांदणी जितेंद्र प्रसाद दीक्षितला १८ लाख आणि मनीष सुखीज नावाच्या व्यक्तीला ६ लाख रुपये पाठवण्यात आले.
कंपनीच्या पैशाने घेतले आयफोन
वेदिकाने प्रोडक्शन हाऊसच्या नावाने ४.३६ लाख रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या आणि वेगवेगळ्या पत्त्यांवर पोहोचवल्या. कंपनीच्या पैशातून २.९४ लाख रुपयांचे आयफोन आणि आयपॅड देखील खरेदी करण्यात आले. या वर्षी जानेवारीमध्ये वेदिकाने एका कार्यक्रमाचे बिल भरण्याच्या बहाण्याने आलियाला एक इनवॉईस पाठवलं तेव्हा हा फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला. आलियाला संशय आला आणि तिने बिलावर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल केला आणि तो वेदिकाच्या मैत्रिणीचा असल्याचं तिला आढळलं. त्यानंतर आलियाने तिच्या बँक खात्यांचे ऑडिट केलं आणि फसवणुकीची माहिती मिळाली.
खोटी बिलं केली तयार
वेदिकाने खोटी बिलं तयार केली आणि त्यावर आलियाची सही घेतली. ती अभिनेत्रीला सांगायची की, ही बिलं तिच्या प्रवास, कार्यक्रम आणि मीटिंग्सवर झालेल्या विविध खर्चासाठी आहेत. आलियाने त्यावर सही केल्यानंतर, वेदिका संबंधित पेमेंट तिच्या जवळच्या मैत्रिणीला पाठवायची, जी संपूर्ण रक्कम तिच्या खात्यात परत ट्रान्सफर करायची. सोनी राजदान यानी तक्रार दाखल केल्यानंतर, वेदिका लपून बसली आणि तिचं लोकेशन बदलत राहिली. अखेर तिला अटक करण्यात आली आहे.