‘डिअर जिंदगी’तून अली जफरला डच्चू; ताहिरची वर्णी ??
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 15:57 IST
आता सिनेप्रेमींचे लक्ष लागले आहे ते शाहरूख खान आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाकडे. ...
‘डिअर जिंदगी’तून अली जफरला डच्चू; ताहिरची वर्णी ??
आता सिनेप्रेमींचे लक्ष लागले आहे ते शाहरूख खान आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाकडे. चित्रपटाचा टीजर पाहून तरी ‘डिअर जिंदगी’ची कथा तरूणाईला खुणावणारी असल्याचेच दिसते आहे. चार हँडसम तरूण आलियाच्या प्रेमात वेडे झालेले असतात पण आलियाला यापैकी एकाची निवड करायची असते आणि याकामी शाहरूख तिला मदत करतो, अशी ही कथा आहे. चित्रपटाचा टीजर पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सूकता कमालीची वाढली असताना, पाकिस्तानी कलाकार अली जफर याच्यामुळे ‘डिअर जिंदगी’वर संकटांचे ढग जमू पाहत आहेत. याचमुळे अली जफरला या चित्रपटातून डच्चू देण्यात आल्याची खबर आहे.होय, पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी लादण्याच्या मागणीमुळे करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ वांद्यात सापडला होता. या चित्रपटाचे प्रदर्शन अडचणीत आले होते. मात्र आर्मी रिलिफ फंडात पाच कोटी जमा करण्याच्या आणि यापुढे कुठल्याही पाकी कलाकारासोबत काम न करण्याच्या अटीवर करणने स्वत:वरचे संकट टाळले. येत्या दिवसांत याच मुद्यावरून गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच गौरी शिंदे यांनी अली जफर यालाच बदलण्याचा निर्णय घेतल्याचे कळतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीला चित्रपटातून काढण्यात आले असून त्याच्या जागी ताहिर राज भसीन याची वर्णी लागलीयं. राणी मुखर्जी हिची मुख्य भूमिका असलेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटात ताहिरने विलेन साकारला होता. सेटवरच्या एका सूत्रानेही या वृत्तास दुजोरा दिला आहे. काल आलिया व ताहिर यांच्यात एक डान्स शूट झाल्याचे या सूत्राने सांगितले. एकंदर काय, तर पाकिस्तानी कलाकारांवर बंदीचा मुद्दा अलीला चांगलाच महागात पडलायं!