बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारबद्दल नुकतीच एक बातमी समोर आली आहे. अक्षय नुकताच एका कार्यक्रमासाठी जम्मूमध्ये आला होता. १२ ऑगस्ट रोजी तो विमानतळावरून एका आलिशान रेंज रोव्हर कारमधून शहरात आला. पण त्याची ही कार जप्त करण्यात आली. अक्षयच्या कारच्या काचांवर काळ्या काचा लावलेल्या होत्या. ट्रॅफिक पोलिसांच्या मते, वाहन चालवताना अशा टिंटेड ग्लासचा वापर करण्यावर कायद्याने बंदी आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कार थांबवून ती जप्त केली.
का झाली कारवाई?
ही घटना डोगरा चौकाजवळ घडली. पोलिसांनी सांगितले की, वाहनाच्या खिडक्यांवरील काळ्या काचा लावल्याने आतमध्ये दिसणे कठीण होते. मोटार वाहन कायद्यानुसार वाहनाच्या काचांवर ठराविक काळ्या रंगाच्या प्रमाणातच या काचा लावू शकतात. त्यापेक्षा जास्त गडद रंगाच्या काचा लावल्यास ती वाहने रस्त्यावर चालवणे बेकायदेशीर ठरते. हा नियम सर्वांसाठी समान आहे, मग तो सामान्य माणूस असो वा चित्रपटातील मोठा कलाकार.
अक्षय कुमार त्यावेळी या कारमध्ये नव्हता. तो विमानतळावरून उतरून दुसऱ्या ठिकाणी गेला होता आणि कार त्याचा ड्रायव्हर चालवत होता. परंतु ही गाडी जेव्हा पोलिसांना रस्त्यावर दिसली तेव्हा त्यांनी ती जप्त करून आवश्यक ती नोंद केली आणि पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले. जम्मू ट्रॅफिक पोलिसांनी मात्र स्पष्ट केले की, नियमभंग कुणीही केला तरी कारवाई होणारच. त्यांच्या मते, अशा गडद टिंटेड ग्लासमुळे अपघातांचा धोका वाढतो आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही ते धोकादायक असते. त्यामुळे या प्रकरणात कायद्याप्रमाणेच कठोर कारवाई करण्यात आली आणि अक्षयची गाडी जप्त करण्यात आली.