बॉलिवूडमधील 'खिलाडी कुमार' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. वर्षाला सर्वाधिक चित्रपट देणारा अभिनेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. २०२५ हे वर्ष अक्षय कुमारसाठी बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलं होतं. आता नव्या वर्षात त्याच्या चित्रपटांसाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच त्यांच्या एका बहुप्रतिक्षित 'भूत बंगला' चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत 'भूत बंगला'ची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाची मांजर कॅलेंडरवरील एका तारखेवर नखाने क्रॉस करते, त्यावर दूध सांडते आणि त्यानंतर एक नवी तारीख समोर येते. पोस्टच्या कॅप्शननुसार, 'भूत बंगला' आता १० एप्रिल २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
आधी काय होती रिलीज डेट?
याआधी हा चित्रपट १५ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता तो महिन्याभर आधीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी हा निर्णय अक्षय कुमारच्या इतर आगामी चित्रपटांच्या शेड्यूलचा विचार करून घेतल्याचे दिसते. महत्त्वाची बाब म्हणजे, ‘भूत बंगला’ हा चित्रपट सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान' या बहुप्रतिक्षित चित्रपटापूर्वी प्रदर्शित होणार आहे. 'भूत बंगला'च्या नव्या रिलीज डेटमुळे अक्षय कुमारचे चाहते अधिकच उत्साहित झाले असून, २०२६ मध्ये हा हॉरर-कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.