Jolly LLB 3 Teaser: 'जॉली एलएलबी' आणि 'जॉली एलएलबी २' हे दोन्ही सिनेने चांगलेच गाजले. पहिल्या भागात अर्शद वारसीने काम केलं तर दुसऱ्या भागात अक्षय कुमारने. या दोन्ही सिनेमांमध्ये एक कलाकार कॉमन होता तो म्हणजे सौरभ शुक्ला. अशातच काही दिवसांपूर्वी 'जॉली एलएलबी ३' सिनेमाची घोषणा झाली. या तिसऱ्या भागात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी एकत्र पाहायला मिळणार आहेत. नुकताच 'जॉली एलएलबी ३' सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'जॉली एलएलबी ३'चा टीझर
'जॉली एलएलबी ३'च्या टीझरमध्ये सुरुवातीला दिल्लीतील जिल्हा सत्र न्यायालय दिसतं. यामध्ये पहिल्यांदा मेरठमधील जॉली म्हणजेच अर्शद वारसीची एन्ट्री होते. अर्शद सुरुवातीला न्यायाधीशाशी बोलताना दिसतो. तुमचा राग आता शांत झालाय का? असं न्यायाधीश सौरभ शुक्ला त्याला विचारतात. अर्शद वरवर प्रेमाने सांगतो पण अशातच तो इतरांशी मारामारी करताना दिसतो. त्यानंतर दुसऱ्या जॉली म्हणजे कानपूरच्या जॉलीची एन्ट्री होते. अक्षय कुमार त्याच्या खास अंदाजात कोर्टात येतो. तो कोर्टात पाऊल ठेवताच न्यायाधीश त्रिपाठींच्या पाया पडायला जातो. पण न्यायाधीश त्रिपाठी त्याला दूर राहायला सांगतात.
'जॉली एलएलबी ३'च्या टीझरशेवटी दिसतं की दोन्ही जॉलीमध्ये हाणामारी होते. दोघांच्या कारस्थानांना न्यायाधीश त्रिपाठी कंटाळतात. हे देवा, एक जॉली सांभाळू शकत नाही इथे दोन दोन जॉली आले आहेत, असं ते म्हणतात. अशाप्रकारे 'जॉली एलएलबी ३'चा टीझर एकदम धमाल आहे. अक्षय कुमार, अर्शद वारसी, सौरभ शुक्ला यांच्या धमाल अभिनयाची जुगलबंदी सर्वांना खळखळून हसवत आहे. 'जॉली एलएलबी ३'चं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं असून हा सिनेमा १९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.