‘जॉली एलएलबी ३’ चा टीझर काल रिलीज झाला. ‘जॉली एलएलबी ३’मध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी एकत्र झळकणार आहेत. दोन्ही जॉली यानिमित्ताने एकत्र येणार आहेत. यानिमित्त ‘जॉली एलएलबी ३’च्या सेटवरील एक मजेदार व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अक्षय कुमार आणि अर्शद वारसी एकत्र फोटोशूट करताना दिसतात आणि दोघांमधली मस्ती चाहत्यांना खूप आवडली आहे.
‘जॉली एलएलबी ३’चा ऑफस्क्रीन धमाल व्हिडीओ
हा धमाल व्हिडीओ शेअर करुन अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “फिल्ममेकिंग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वेडेपणाच्या जगातील काही क्षण शेअर करतोय." हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कमेंटमध्ये “दोघांची जोडी भारी!”, “फनी आणि क्यूट!”, “मोठ्या पडद्यावर पाहण्याची आतुरता” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी टाकून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
याआधी ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता, ज्यात अक्षय कुमार आणि अरशद वारसी कोर्टरूममध्ये एकमेकांना चॅलेंज करताना दिसतात. सौरभ शुक्ला न्यायाधीशाच्या भूमिकेत असून त्यांच्यासमोर दोन्ही वकिलांचा वाद सुरू असतो. सिनेमाचा टीझर विनोद आणि खुसखुशीत संवादांनी पेरलेला असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘जॉली एलएलबी ३’ मध्ये अक्षय कुमार, अरशद वारसी, सौरभ शुक्ला यांच्यासोबत हुमा कुरैशी, अमृता राव, अन्नू कपूर आणि सीमा बिस्वास यांच्याही भूमिका दिसण्याची शक्यता आहे. हा सिनेमा १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.