Join us

​अजय देवगण आणि प्रकाश राज झळकणार गोलमाल अगेनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 10:59 IST

सिंघम या चित्रपटात प्रकाश राज आणि अजय देवगण यांनी एकत्र काम केले होते. अजय हा एक चांगला अभिनेता असल्याचे ...

सिंघम या चित्रपटात प्रकाश राज आणि अजय देवगण यांनी एकत्र काम केले होते. अजय हा एक चांगला अभिनेता असल्याचे त्याने गेल्या कित्येक वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत सिद्ध केले आहे तर प्रकाश राज हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज कलाकार मानला जातो. त्याने वाँटेड, सिंघम यांसारख्या हिंदी चित्रपटांमधूनदेखील त्याच्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. सिंघम या चित्रपटातील अजय आणि प्रकाशराज यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. आता गोलमाल अगेन या चित्रपटात ते पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत.रोहित शेट्टीच्या गोलमाल या प्रसिद्ध चित्रपटाचा पुढचा भाग लवकरच येणार असून या चित्रपटात प्रकाश राजचीदेखील महत्त्वाची भूमिका असणार आहे. प्रकाश राजने गेल्या महिन्यात हा चित्रपट साइन केला असून मार्चमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला तो सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत होणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी प्रकाश खूपच उत्सुक आहे. तो सांगतो, "रोहितसोबत काम करण्याची माझी कित्येक वर्षांपासूनची इच्छा आहे. पण रोहितकडे माझ्यासाठी योग्य भूमिका नसल्याने आम्हाला एकत्र काम करता आले नव्हते. मला या चित्रपटाबाबत सांगण्यात आल्यानंतर मी लगेचच मुंबईत आलो आणि संवाद लेखक साजिद-फरहाद याच्याकडून या चित्रपटाची कथा ऐकली. मला या चित्रपटाची कथा आणि माझी भूमिका खूपच मनोरंजक वाटल्याने मी हा चित्रपट करण्याचे ठरवले. माझ्या भूमिकेला ग्रे छटा असल्या तरी मी प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. मी आणि अजयने सिंघम या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यामुळे आमच्या दोघांची केमिस्ट्री खूपच छान जमली आहे. अजय हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आहे. तो अभिनय इतका सहज करतो की त्याच्यासोबत काम करण्याचा एक वेगळा अनुभव असतो." गोलमाल अगेन या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत असून परिणिती चोप्रा, अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे आणि तब्बू यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.