Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर'च्या यशानंतर रणवीर सिंग आता 'डॉन ३'साठी सज्ज; विक्रांत मेस्सीची होणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:03 IST

Ranveer Singh Begins Prepration For Movie Don 3 : 'धुरंधर'च्या तुफान यशानंतर रणवीर सिंग आता त्याच्या आगामी मोठ्या प्रोजेक्टसाठी म्हणजेच 'डॉन ३' (Don 3) साठी सज्ज झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने या चित्रपटासाठी ॲक्शनची तयारीही सुरू केली आहे. विशेष म्हणजे, विक्रांत मेस्सी देखील या प्रोजेक्टमध्ये परतल्याची चर्चा आहे.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून आतापर्यंत ५५० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटातील रणवीरच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशानंतर रणवीरला पहिल्यांदाच पत्नी दीपिका पादुकोणसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. याच दरम्यान, रणवीरने आता 'डॉन ३' च्या शूटिंगसाठी कंबर कसल्याची माहिती समोर आली आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये शाहरुख खानच्या 'डॉन' मालिकेतील तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये शाहरुखच्या जागी रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असेल असे सांगण्यात आले होते. तेव्हा काही चाहते नाराजही झाले होते. या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी २०२५ मध्ये सुरू होणार होते, परंतु दिग्दर्शक फरहान अख्तरच्या इतर कामांमुळे चित्रपट लांबणीवर पडला होता.

विक्रांत मेस्सीबाबत मोठी अपडेट'न्यूज १८'च्या रिपोर्टनुसार, एका सूत्राने माहिती दिली की, रणवीरने या चित्रपटातील ॲक्शन सीक्वन्ससाठी सराव सुरू केला आहे. मध्यंतरी व्हिलनच्या भूमिकेसाठी चर्चेत असलेल्या विक्रांत मेस्सीने हा चित्रपट सोडल्याच्या अफवा पसरल्या होत्या, ज्यामुळे चित्रपट रखडणार अशी चर्चा होती. मात्र, आता सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, प्रॉडक्शन टीम आता अधिक उशीर करू इच्छित नाही. शेड्यूलच्या काही समस्या आता सुटल्या असून काम वेगाने सुरू झाले आहे.

क्रिती सनॉन आणि विक्रांत मेस्सी देखील दिसणार 'डॉन ३'मध्येसूत्रांनी पुढे सांगितले की, रणवीरचा 'धुरंधर' हिट ठरला आहे आणि क्रिती सनॉनच्या 'तेरे इश्क में' चित्रपटानेही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हे दोन्ही कलाकार आता 'डॉन ३'ला पूर्ण वेळ देण्यासाठी तयार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलचे काही भाग सौदी अरेबियामधील जेद्दामध्ये शूट केले जातील. क्रितीची भूमिका प्रियांका चोप्राच्या 'रोमा' पात्रासारखी असेल, ज्यामध्ये ती ॲक्शन करताना दिसेल. तसेच, विक्रांत मेस्सीसोबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून तो या चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे. सध्या त्याच्या तारखांवर काम सुरू असून स्क्रिप्टमध्येही थोडेफार बदल केले जात आहेत.

टॅग्स :रणवीर सिंगविक्रांत मेसीक्रिती सनॉन