Join us

वडिलांच्या मृत्यूनंतर रोहित शेट्टीने सुरु केले होती 30 रुपये पगारावर नोकरी, आज आहे कोट्याधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 14:16 IST

खूपच कमी वयात घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावर आली.

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग आणि कतरिना कैफ यांच्यामुख्य भूमिका आहेत. रोहित शेट्टीने आजवर सिम्बा, गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल 3, गोलमाल अगेन, सिंघम, सिंघम 2, चेन्नई एक्सप्रेस यांसारखे हिट सिनेमा दिले आहेत.

रोहित शेट्टीचे वडील एमबी शेट्टी यांनी अनेक जुन्या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. रोहितचे वडील चित्रपटांमध्ये काम करत असले तरी त्यांच्या मृत्युनंतर रोहितला खूप संघर्ष करावा लागला. खूपच कमी वयात घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावर आली.

रोहितला त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याचे शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही. याविषयी त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, परिस्थितीमुळे मला खूपच कमी वयात शिक्षण सोडावे लागले. कॉलेजमध्ये जाण्यासाठी पुस्तकं आणि कपडे विकत घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे मी कॉलेजमध्ये न जाता पैसे कमावण्याकडे लक्ष दिले. वडील चित्रपटसृष्टीचा भाग असल्याने मला चित्रपटसृष्टीविषयी नक्कीच आकर्षण होते. मी सतराव्या वर्षीच असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. माझी पहिली कमाई केवळ 30 रुपये होती. फूल और काटे हा माझा पहिला चित्रपट होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण 1995 साली प्रदर्शित झालेल्या हकीकत या चित्रपटाच्या वेळी मी या चित्रपटाची नायिका तब्बूच्या साड्यांना इस्त्री करण्याचे काम करत होतो.

रोहितने जमीन या चित्रपटाद्वारे त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यामुळे त्याला त्याच्या करियरचे चांगलेच टेन्शन आले होते. त्याच्यासोबत काम करायला कोणीच तयार नव्हते. पण अजय देवगण या त्याच्या मित्राने त्याला साथ दिली आणि त्यानंतर आलेल्या गोलमाल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. त्यानंतर रोहितने कधीच मागे वळून पाहिले नाही.

टॅग्स :रोहित शेट्टी