सिनेइंडस्ट्रीत काम करताना अनेकांना दिग्दर्शक किंवा निर्मात्यांकडून वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात. काही सेलिब्रिटींसोबत कास्टिंग काऊचचे धक्कादायक प्रकारही घडले आहेत. केवळ अभिनेत्रीच नव्हे तर अभिनेत्यांना अशा ऑफर मिळाल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी यालाही इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा अनुभव आला. त्याने हा अनुभव शेअर केला आहे.
आफताब शिवदासानी आणि विवेक ओबेरॉय यांनी रितेश देशमुख आणि साजिद खान होस्ट करत असलेल्या यारों की बारात या टीव्ही शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये आफताबने करिअरच्या सुरुवातीला त्याला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याचा खुलासा केला. इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध व्यक्ती रात्री उशिरा त्याला कॉल करून हॉटेलवर बोलवायची, असं आफताबने सांगितलं.
सुरुवातीला मॉडेलिंग करताना सिनेमात काम देतो असं सांगून तो आफताबला रात्री उशीरा फोन करायचा. पण, ती व्यक्ती आफताबला रात्री कॉल का करतेय हे अभिनेत्याला कळून चुकलं होतं. त्यामुळे मग नंतर त्याने त्याचे फोन घेणं बंद केलं. आफताबने या मुलाखतीत त्या व्यक्तीचं नाव सांगितलं नाही. पण, इंडस्ट्रीत त्याला ओळख होती, असं त्याने सांगितलं. आफताबने १९९९ साली मस्त या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तो दिसला. 'वेलकम टू द जंगल', 'मस्ती ४', 'कसूर २' या सिनेमांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.