Join us
Daily Top 2Weekly Top 5

अदनान सामीचा मुलगा म्हणतोय, मी भारतात वाढलो असलो तरी पाकिस्तानच माझे पहिले घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 17:02 IST

अझनान भारतात लहानाचा मोठा झाला असला तरी त्याच्यासाठी पाकिस्तान हेच पहिले घर आहे.

ठळक मुद्देमी लहानाचा मोठा भारतात झालो आहे. पण तरीही पाकिस्तानमधील इंडस्ट्री हे माझे कुटुंब आहे. त्यांना माझ्या कामाबाबत आदर असून त्यांच्या माझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. 

संगीतकार-गायक अदनान सामी हा मुळचा पाकिस्तानचा असला तरी त्याला काही वर्षांपूर्वी भारताचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. पण त्याचा मुलगा अझनान सामीने नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. 

अझनानने नुकतीच बीबीसीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने म्हटले आहे की, तो भारतात लहानाचा मोठा झाला असला तरी त्याच्यासाठी पाकिस्तान हेच पहिले घर आहे. या मुलाखतीत अझनाने पाकिस्तानविषयी बोलताना सांगितले आहे की, मी आजवर या गोष्टीवर कधीच बोललो नाही याचे कारण केवळ माझे वडील आहेत. मी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतो आणि त्यांचा तितकाच आदर देखील करतो. त्यांना कोणत्या देशात राहायचे आहे. त्यांना कोणता देश आपले घर म्हणून निवडायचे आहे याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या या निर्णयाचा मी आदर करतो. पण मला कोणत्या देशाला घर मानायचे आहे हे मला माझे स्वातंत्र्य आहे आणि मी पाकिस्तानात काम करण्याचे ठरवले आहे.

अझनान हा देखील एक संगीतकार असून तो लहान असताना भारतातच राहात होता. पण तरीही पाकिस्तानाला तो त्याचे घर मानत असून त्याला त्याच्या या मताबद्दल अभिमान आहे. 

त्याने या मुलाखतीत पुढे सांगितले की, माझे भारतातही काही मित्र आहेत. माझे बालपण भारतात गेले आहे. मी लहानाचा मोठा भारतात झालो आहे. पण तरीही पाकिस्तानमधील इंडस्ट्री हे माझे कुटुंब आहे. त्यांना माझ्या कामाबाबत आदर असून त्यांच्या माझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. 

अझनान हा अदनान सामी आणि पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तियार यांचा मुलगा असून झेबाने हिना या प्रसिद्ध चित्रपटात हिना ही मुख्य भूमिका साकारली होती. अदनान आणि झेबा यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. अझनान त्याच्या वडिलांना संगीतातील लिजंड मानतो. याविषयी त्याने या मुलाखतीत सांगितले आहे की, मी माझे काम आधी त्यांना दाखवतो. ते माझे सगळ्यात मोठे समीक्षक आहेत. 

टॅग्स :अदनान सामी