आदित्य पांचोलीने कंगना राणौतला दिले खुले आव्हान; गुन्हा दाखल केला असेल तर एफआयआरची कॉपी दाखव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 17:00 IST
अभिनेत्री कंगना राणौत हिने इंडिया टीव्ही या चॅनलच्या ‘आप की अदालत’ या शोमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ ...
आदित्य पांचोलीने कंगना राणौतला दिले खुले आव्हान; गुन्हा दाखल केला असेल तर एफआयआरची कॉपी दाखव!
अभिनेत्री कंगना राणौत हिने इंडिया टीव्ही या चॅनलच्या ‘आप की अदालत’ या शोमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध व्यक्तींवर कंगनाने आरोपांच्या फैरी झाडल्याने सध्या वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. हृतिक रोशनसारख्या बड्या सुपरस्टार्सवर लावलेले आरोप धक्कादायक असून, ते जर सिद्ध झाले तर त्याच्या करिअरवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर आदित्य पांचोलीवरही कंगनाने अनेक आरोप केले आहेत. कंगनाने म्हटले होते की, आदित्य पांचोलीने मला हाउस अरेस्ट केले होते. त्याकरिता मी त्याच्यावर गुन्हाही नोंदविला आहे. आता कंगनाच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी आदित्य पांचोली मैदानात उतरला असून, त्याने तिला खुले आव्हान दिले आहे. ‘जर तू गुन्हा नोंदविला असेल तर त्याच्या एफआयआरची कॉपी दाखव’ असे आदित्यने म्हटले आहे. आदित्यने म्हटले की, ‘कंगना तू जर खरंच बोलत आहेस तर एफआयआर दाखव’ स्पॉटबॉय या इंग्रजी वेबसाइटशी बोलताना आदित्यने म्हटले की, ‘कंगना ढळढळीत खोटं बोलत आहे. जर तिने माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली तर तिने ती लोकांना दाखवावी. त्याचबरोबर जर ती एफआयआरची कॉपी हरविल्याचे म्हणत असेल तर तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती कॉपी पुन्हा मागवावी आणि जनतेला दाखवावी. जर ती खरोखरंच खरं बोलत असेल तर तिने माझे हे छोटेसे आव्हान स्वीकारायला हवे. माझ्या मते ही बाब तिच्यासाठी खूपच किरकोळ असावी. त्यामुळे तिने ते स्वीकारायला काहीच हरकत नसल्याचेही आदित्यने म्हटले. पुढे बोलताना आदित्य पांचोलीने म्हटले की, जर तिने एफआयआर दाखल केलेलीच नसेल, (एफआयआर दाखल केलेलीच नाही) तर तसे तिने जाहीरपणे मान्य करावे. आदित्यच्या या वक्तव्यानंतर तिची लहान बहीण रंगोली खूपच भडकली असून, तिने ट्विटर हॅण्डलवरूनच त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आहे. सध्या या दोघी बहिणींच्या निशाण्यावर आदित्य पांचोली असल्याची इंडस्ट्रीत चर्चा आहे.