Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ही' अभिनेत्री साकारणार पंतप्रधान मोदींच्या आईची भूमिका, मोदींच्या पत्नी आणि आईच्या भूमिकेची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 06:00 IST

पीएम नरेंद्र मोदी असं या बायोपिकचे नाव असून अभिनेता विवेक ओबेरॉय मोदी यांची मुख्य भूमिका साकारणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपट बनतो म्हटल्यावर यांत कुणाच्या भूमिका असणार, कोणता कलाकार कोणती भूमिका साकारणार याची उत्सुकता वाढू लागली आहे. पीएम नरेंद्र मोदी असं या बायोपिकचे नाव असून अभिनेता विवेक ओबेरॉय मोदी यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री अभिनेत्री बरखा बिष्ट मोदींची पत्नी जसोदाबेन ही भूमिका साकारणार आहे. मात्र मोदींच्या जीवनात मोलाचं योगदान असणारी व्यक्ती म्हणजे त्यांच्या आईची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता होती. अखेर हीराबेन म्हणजेच मोदींच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव समोर आले आहे. अभिनेत्री जरीना वहाब ही भूमिका साकारणार आहे. 

१९५६ साली विशाखापट्टणम इथं जन्म झालेल्या जरीना वहाब यांनी हिंदीसह तेलुगू आणि मल्याळम चित्रपटात काम केले आहे. २०१६ साली आलेल्या ‘ये तो टू मच हो गया’ या चित्रपटात जरीना वहाब यांचं अखेरचं दर्शन झालं होतं. १९७७ साली घरौंदा चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं होतं. चित्रपटसृष्टीत विविध राजकीय नेत्यांच्या जीवनावरील बायोपिक रुपेरी पडद्यावर येण्याची जणू काही स्पर्धाच सुरू झाली आहे की काय असं चित्र पाहायला मिळत आहे. 

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ठाकरे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील द एक्सिडेंटल प्राइमिनिस्टर अशा चित्रपटांची जोरदार चर्चा ऐकायला मिळाली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवनावरील चित्रपटही लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहेत. 

टॅग्स :पी. एम. नरेंद्र मोदीविवेक ऑबेरॉय