इमरान हाश्मी(Emraan Hashmi)च्या 'आवारापन २' (Aavaarapan 2 Movie) या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटातील कलाकारांबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला 'आवारापन २'मध्ये भूमिका मिळाल्याची चर्चा आहे. या वर्षी घोषित झालेल्या मोठ्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, त्यात इमरान हाश्मीच्या 'आवारापन २' चित्रपटाचं नाव नक्कीच येईल. २००७ साली आलेल्या 'आवारापन'च्या या सीक्वेलसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे.
आता असं वृत्त समोर आलं आहे की 'आवारापन २' मध्ये एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची एंट्री झाली आहे, जी पडद्यावर इमरान हाश्मीसोबत रोमान्स करताना दिसेल. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शक विक्रम भट यांच्या या चित्रपटासाठी दिशा पटानीला मुख्य अभिनेत्री म्हणून निवडण्यात आलं आहे. होय, 'आवारापन' च्या सीक्वलमध्ये दिशा इम्रान हाश्मीसोबत रोमान्स करताना दिसेल. लवकरच निर्माते याबद्दल अधिकृत घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. ही बातमी समोर आल्यानंतर 'आवारापन २' साठी चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. इमरान हाश्मी आणि दिशा पटानी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. २००७ मध्ये आलेल्या 'आवारापन' मध्ये श्रिया सरन आणि मृणालिनी शर्मा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
'आवारापन २' कधी प्रदर्शित होईल?या वर्षी मार्च महिन्यात एका प्रमोशनल व्हिडिओद्वारे इम्रान हाश्मीने जाहीर केलं होतं की १९ वर्षांनंतर 'आवारापन' पुन्हा थिएटरमध्ये परत येईल. याची रिलीज डेट पाहता, ३ एप्रिल २०२६ रोजी 'आवारापन' चा सिक्वेल जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.