बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या चर्चेत आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर त्याचा हा 'बेबी जॉन' हा सिनेमा २५ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली कुमार आणि कलाकार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. नुकतंच सिनेमा हीट व्हावा यासाठी सिनेमाच्या संपुर्ण टीमनं उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वरचं दर्शन घेतलं आहे.
'एएनआय' या वृत्त संस्थेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वरुण धवन आणि अॅटली कुमार हे मंदिरात बसलेले दिसत आहेत. वरुण आणि अॅटली दोघेहीपांढरा कुर्ता-पायजमामध्ये दिसले. तर अॅटलीची पत्नी प्रिया आणि चित्रपटाची मुख्य अभिनेत्री कीर्ती सुरेश या दोघीही पारंपारीक लूकमध्ये पाहायला मिळाल्या. आगामी 'बेबी जॉन' सिनेमाच्या यशासाठी त्यांनी पार्थना केली.
'बेबी जॉन' चित्रपटात वरूण धवनसोबत कीर्ती सुरेश, सान्या मल्होत्रा, जॅकी श्रॉफ, वामिका गब्बी हे कलाकार दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खानचा कॅमिओ देखील दिसणार आहे. ट्रेलरमध्ये त्याची एक छोटीशी झलकही पाहायला मिळाली होती, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणखीनच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात वरुण एका नव्या आणि वेगळ्या अंदाजात दिसणार आहे, ही त्याच्या चाहत्यांसाठी खूप आनंदाची बाब आहे. 25 डिसेंबर हा सुट्टीचा दिवस असल्याने हा चित्रपट तिकीट खिडकीवर चांगली ओपनिंग घेऊ शकतो असे मानले जात आहे.