Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनो, तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका! राजीव खंडेलवालने सांगितली भावुक कहाणी, म्हणाला- "आईला वाढत्या वयानुसार..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:33 IST

'तुम हो ना' या रिअ‍ॅलिटी शोच्या आगामी भागात आपल्या आईच्या आठवणीत राजीवच्या डोळ्यांत पाणी आलं. याशिवाय आईच्या मृत्यूसाठी राजीवने स्वतःला जबाबदार धरलं आहे

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे राजीव खंडेलवाल. सध्या एका भावुक कारणाने राजीव चर्चेत आला आहे. 'तुम हो ना' या रिअ‍ॅलिटी शोच्या आगामी भागात आपल्या आईच्या आठवणीत राजीवच्या डोळ्यांत पाणी आलं. याशिवाय आईच्या मृत्यूसाठी राजीवने स्वतःला जबाबदार धरलं आहे. असं का म्हणाला राजीव?

'तुम हो ना' या शोच्या प्रोमोमध्ये राजीव खंडेलवाल आपल्या दिवंगत आईच्या कॅन्सर संघर्षाबद्दल बोलताना कमालीचा भावुक झालेला दिसला. त्याने सांगितलं की, तो आजही स्वतःला त्याच्या आईच्या मृत्यूसाठी गुन्हेगार समजतो. राजीवच्या आईचे २०१८ मध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे (Ovarian Cancer) निधन झाले होते. सुमारे दीड वर्ष या जीवघेण्या आजाराशी झुंज दिल्यानंतर राजीवच्या आईची प्राणज्योत मालवली होती.

आपले दुःख व्यक्त करताना राजीव म्हणाला, "आईला जी सुरुवातीची लक्षणे जाणवत होती, ती मला वेळेत समजली नाहीत. वाढत्या वयानुसार आईला आरोग्यासंबंधी हे त्रास होत असावेत, असं मला वाटलं. पण ही माझी मोठी चूक होती." एकूणच हा पश्चात्ताप राजीवला आजही अस्वस्थ करतो. काहीवेळेस छोट्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण आपल्या माणसांना गमावतो, हे राजीवने सर्वांना सांगितलं.

राजीवने देशातील महिलांना आवाहन केले की, त्यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे कधीही दुर्लक्ष करू नये. अनेकदा महिला थकवा किंवा गॅसचा त्रास समजून आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, पण ही लक्षणं गंभीर असू शकतात. "मी माझ्या आईसाठी जे करायला हवे होते ते करू शकलो नाही, पण तुम्ही तुमच्या आसपासच्या महिलांना जागरूक करू शकता," असे कळकळीचे आवाहन त्याने केले.

राजीव खंडेलवालची कारकीर्द

राजीवने आपल्या कारकीर्दीची प्रवासाची सुरुवात २००० च्या सुमारास जाहिरातींमधून केली होती. २००३ मध्ये एकता कपूरच्या 'कहीं तो होगा' या मालिकेतील 'सुजल ग्रेवाल' या भूमिकेने त्याला घराघरात पोहोचवले. त्यानंतर २००८ मध्ये 'आमिर' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कमी बजेटच्या या चित्रपटाने त्याच्या अभिनयाची ताकद बॉलिवूडला दाखवून दिली. यानंतर त्याने 'शैतान', 'टेबल नंबर २१' आणि 'सम्राट अँड कंपनी' सारख्या वेगळ्या चित्रपटांतून स्वतःची ओळख निर्माण केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajeev Khandelwal urges women to prioritize health, shares emotional story.

Web Summary : Rajeev Khandelwal emotionally recounted his mother's cancer battle, urging women to not ignore health issues. He regrets not recognizing her symptoms earlier, emphasizing timely awareness.
टॅग्स :राजीव खंडेलवालबॉलिवूडमृत्यू