कालच दिवंगत अभिनेता इरफानचा (irfan) मुलगा बाबील खानने बॉलिवूड फेक आहे असं म्हणत त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केलं. त्यानंतर आता नवाजुद्दीन सिद्दीकीने (nawazuddin siddiqui) बॉलिवूडच्या सध्याच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उमटवलं आहे. याशिवाय बॉलिवूडच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल काळजी व्यक्त केली आहे. "बॉलिवूडमध्ये एकच कल्पना वारंवार वापरली जाते. एकच गोष्ट अनेकदा केली जाते", अशा शब्दात नवाजुद्दीनने बॉलिवूडवर ताशेरे ओढले. काय म्हणाला अभिनेता, जाणून घ्या.
नवाजुद्दीन बॉलिवूडबद्दल काय म्हणाला?
पूजा तलवारला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनने बॉलिवूडच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं. तो म्हणाला की, "बॉलिवूडमध्ये एक प्रकारची असुरक्षितता आली आहे. एक कल्पना वारंवार वापरली जात आहे. एक गोष्ट जर लोकांना आवडली तर तीच गोष्ट पुन्हा पुन्हा केली जाते. जेव्हा लोक या गोष्टींना कंटाळतात तेव्हा बॉलिवूडमध्ये ती गोष्ट वापरणं बंद केलं जातं. एक कल्पना घासून गुळगुळीत करण्याइतपत वापरली जाते. एका सिनेमाचे २, ३, ४ भाग यायला लागले आहेत, ही वाह्यात गोष्ट आहे. कुठे ना कुठे क्रिएटिव्हीटी थांबत चालली आहे. सुरुवातीपासून आपली इंडस्ट्री चोर आहे. आपण गाणी चोरली, कथा चोरली."
नवाजुद्दीन पुढे म्हणाला की, "जर चोर असतील तर ते क्रिएटिव्ह कसे असतील? आपण साउथ मधून चोरी केली, कधी दुसरीकडून चोरी केली. जे सिनेमे गाजले आहेत त्या सिनेमातील सीन्सही चोरी केलेले आहेत. ही गोष्ट आता इतकी सहजपणे स्वीकारली जाते की, चोरी केली तर काय झालं? असं त्यांना वाटतं. आधी ते एक व्हिडीओ घेणार आणि म्हणणार की, आम्हाला यावर सिनेमा करायचा आहे. त्यानंतर त्या मूळ सिनेमातील गोष्टीला ते पुन्हा रिपीट करतात. अशा इंडस्ट्रीतून तुम्ही काय अपेक्षा ठेवणार? त्यामुळे कसे अभिनेते पुढे येतील? हे अभिनेते एकाच प्रकारचा अभिनय करतात. त्यामुळे अभिनेते आणि दिग्दर्शकांनी बॉलिवूड सोडायला सुरुवात केली. अनुराग कश्यपसारखे चांगले दिग्दर्शक इंडस्ट्री सोडून जात आहेत."