बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे आणि इतर कारणांमुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक दिग्दर्शिकादेखील होती. पण, तिचं वैयक्तिक आयुष्य कायमच वादग्रस्त राहिलं. आता पूजाबद्दल बॉलिवूड अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे. स्पेशल ऑप्स २ फेम अभिनेत्याने पूजा भटच्या सेटवरील आक्षेपार्ह वागणुकीबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
अभिनेता आणि मॉडेल असलेल्या मुजम्मिल इब्राहिमने २१व्या वर्षी पूजा भटने दिग्दर्शित केलेल्या धोखा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण, सेटवर पूजाने खूप त्रास दिला. त्यामुळे डिप्रेशनमध्ये गेल्याचं मुजम्मिलने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. तो म्हणाला, "मी याआधी कधीच एवढं टॉक्झिक वातावरण पाहिलं नव्हतं. मला शिव्या देण्याची सवय नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी तो खूपच वाईट अनुभव होता. आणि अशा वातावरणात काम करणं कठीण होतं. मला खूप टॉर्चर केलं गेलं. पण काम करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. माझ्या कुटुंबात मी एकटा कमावता होतो".
"मी राज २ सिनेमालादेखील नकार दिला. जेव्हा मी सिनेमा नाकारला तेव्हा माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला. पूजा भट माझ्याबद्दल अफवा पसरवत होती. तिचा अॅटिट्यूड असा असायचा की ती कलाकारांना कुत्र्यासारखी वागणूक द्यायची. जर तिने बसायला सांगितलं तर बसायचं आणि उभं राहायला सांगितलं तर उभं राहायचं. मला माहीत नाही की ती असं का वागायची. पण, आज मी जितक्या वयाचा आहे तेव्हा तिचं वयदेखील तेवढंच होतं. पण, आज जर मला कोणी २० वर्षाच्या मुलासोबत काम करायला सांगितलं तर मी त्याच्याशी व्यवस्थित वागेन", असं मुजम्मिलने सांगितलं.
पुढे तो म्हणाला, "त्यांना वाटत होतं की आम्ही त्यांचे चमचे बनून राहावं. पण, मी असं केलं नाही आणि त्यांच्यापुढे झुकलोही नाही. पण, याचे परिणाम मला भोगावे लागले. पूजा भटने माझं करिअर बरबाद केलं. मला अॅटिट्यूड असल्याचं तिने इंडस्ट्रीमध्ये पसरवलं. तिच्या वागणुकीमुळे माझ्या मानसिक स्वास्थावर परिणाम झाला होता. मला रात्री झोप लागायची नाही आणि अजूनही मी याचा सामना करत आहे".