Join us

ऐश्वर्या रायने ठोठावला दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:48 IST

ऐश्वर्यानं दिल्ली न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोक तिचे चाहते आहेत. आजही ऐश्वर्या अनेक हॉट-बोल्ड अभिनेत्रींना आपल्या सालस सौंदर्याने तगडी टक्कर देते. ५१ वर्षांची असेलली ऐश्वर्या आजही विशीतल्या अभिनेत्री इतकीच सुंदर दिसते. अशातच ऐश्वर्यानं आपली ओळख आणि व्यक्तिमत्वाच्या सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.   एआय (AI) द्वारे आक्षेपार्ह फोटो तयार करुन त्यांचा उपयोग व्यावसायिक पद्धतीने केला जातो आहे. आपल्या व्यक्तिगत ओळख अधिकाराचं हे हनन आहे, असं तिच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.

ऐश्वर्या राय यांचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील संदीप सेठी यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना म्हटले की, "आरोपींना तिच्या (ऐश्वर्याच्या) फोटो, निवड किंवा व्यक्तिमत्त्वाचा वापर करण्याचा कोणताही अधिकार नाही". सेठी यांनी पुढे गंभीर आरोप करत म्हटले की, "तिचे नाव आणि निवड काही लोकांच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरली जात आहे, जे अत्यंत दुर्दैवी आहे". 

त्यांनी असेही सांगितले की, काही पूर्णपणे अवास्तव आणि बनावट छायाचित्रे इंटरनेटवर अपलोड केली जात आहेत. या गैरवापरामुळे ऐश्वर्या राय यांच्या प्रसिद्धी आणि वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन होत आहे. ऐश्वर्या रायची बाजू ऐकल्यानंतर या प्रकरणात १५१ युआरएल्स तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ नोव्हेंबर रोजी संयुक्त रजिस्ट्रारसमोर, तर १५ जानेवारी २०२६ रोजी पुन्हा न्यायालयासमोर निश्चित केली आहे. ऐश्वर्या राय यांच्या वकिलांच्या टीममध्ये प्रवीण आनंद आणि ध्रुव आनंद यांचाही समावेश आहे. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन