Abhijeet Bhattacharya on Mahatma Gandhi: प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांनी काही महिन्यांपुर्वी एका मुलाखतीमध्ये "महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते" असे वर्णन केलं होतं. त्यावरुन अभिजित भट्टाचार्य हे अडचणीत आले होते. त्यांच्या सर्व स्तरातून टीका झाली होती. यानंतर आता पुन्हा त्यांनी महात्मा गांधींबद्दल वक्तव्य केलं असून ते चर्चेत आलं आहे.
नुकतंच अभिजीत भट्टाचार्य हे एएनआय या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये देशातील सर्व मुद्द्यांवर मोकळेपणाने बोलताना दिसले. यावेळी महात्मा गांधींबद्दल ते म्हणाले, "आपल्याला शिकवलं जातं की जर कोणी तुमच्या एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करा. शाळेतील पाठ्यपुस्तकात ते अधोरेखित केलेलं आहे". यावर अभिजित यांना विचारलं की हे चुकीचं आहे का? उत्तरात ते म्हणाले, "जर एखाद्या व्यक्तीनं वडिलांना मारलं, तर आपण वडिलांना म्हणू का की बाबा आता दुसरा गालही फिरवा... असं होत नाही. आपण त्यातले नाही. आपण आधीच त्याच्या दोन कानशिलात देऊ".
पुढे ते म्हणाले, "पाकिस्तान बनवला गेला, तो कोणी बनवला? पाकिस्तान तर आस्तित्वात नव्हताच ना? तो १९४७ मध्ये बनवला गेला. भारत तर सुरुवातीपासूनच भारत होता. मग तुम्ही त्यांना राष्ट्रपिता कसं काय म्हणता? गांधीजींनी फक्त एकच राष्ट्र निर्माण केला आणि तो म्हणजे पाकिस्तान. इंदिरा गांधींनी बांगलादेश निर्माण केला. मी महात्मा गांधींपेक्षा इंदिरा गांधींचा जास्त आदर करतो. भारत कित्येक वर्षांपासून अस्तित्वात आहे. आपल्याकडे ऋषी आणि संत होऊन गेलेत".
गेल्या वर्षीच्या अखेरीस अभिजित भट्टाचार्य यांनी शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये महात्मा गांधींना पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हटले होते. "महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. भारत आधीच भारत होता, पाकिस्तान हा निर्माण झाला. येथे महात्मा गांधींना चुकून राष्ट्रपिता म्हटलं गेलं. ते पाकिस्तानचे निर्माते, वडील, आजोबा सर्वकाही होते".