आमिर खान साकारणार अंतराळवीराची भूमिका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 16:07 IST
बॉलिवूड स्टार आमिर खान आपल्या बहुरंगी अभिनयाविषयी प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करण्याकडे त्याचा कल असतो. त्यासाठी प्रचंड मेहनत ...
आमिर खान साकारणार अंतराळवीराची भूमिका!
बॉलिवूड स्टार आमिर खान आपल्या बहुरंगी अभिनयाविषयी प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करण्याकडे त्याचा कल असतो. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायची त्याची तयारीही असते. आता आमिर खान नेमका काय करणार आहे? याची उत्सुकता सर्वांनाच असते. येत्या काही दिवसात आमिर खान हा अंतराळवीर ही भूमिका पार पाडणार असल्याचे समजतेय. डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार आमिर खान हा हैदराबादचा अंतराळवीर राकेश शर्मा याची भूमिका निभावणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मथाई हा करणार असल्याचे कळतेय.राकेश शर्मा यांनी २ एप्रिल १९८४ साली सोयुझ टी-११ या यानातून अंतराळात जाणारा पहिला भारतीय म्हणून मान मिळविला होता. ३५ व्या राष्टÑीय संरक्षण अकादमीचे विद्यार्थी असणारे राकेश शर्मा हे भारतीय वायूदलात टेस्ट पायलट म्हणून १९७० साली सहभागी झाले. दरम्यान त्यांनी विमान चालविण्याचे कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर १९८४ साली स्क्वॅड्रन लीडर आणि पायलट म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९८२ साली इस्त्रो आणि सोव्हिएट इंटरकॉसमॉस यांच्या संयुक्त अभियानासाठी त्यांची निवड झाली. त्यानंतर अंतराळात जाणारे ते पहिले भारतीय ठरले. ७ दिवस २१ तास आणि ४० मिनिटे इतका वेळ त्यांनी अंतराळात घालविला. या वृत्तपत्राच्या अनुसार राकेश शर्मा म्हणाले, गेल्या आठ वर्षांपासून याबाबत तयारी सुरू आहे. या क्षणापर्यंत येण्यासाठी खूप मोठा अवधी लागला. या चित्रपटाचे निर्माते इतर कामात व्यस्त होते. माझी भूमिका आमिर खान हा करणार आहे, बाकीच्या गोष्टींची माहिती नाही.दंगल चित्रपटाच्या यशानंतर आमिर खान सध्या ठग आॅफ हिंदुस्तान या चित्रपटाची तयारी करतो आहे. राकेश शर्मांच्या अंतराळवीराच्या भूमिकेबाबत आमिरचे चाहते नक्कीच उत्सुक असतील. येत्या काही काळानंतर आमिर खानसोबत आणखी कोणते कलाकार काम करतील? हे कळेल.