आपल्या भारतात लग्न म्हणजे थाटमाट, सजावट, हजारो पाहुणे, डीजे, बँड-बाजा आणि हजारो-लाखोंचा खर्च! अगदी सामान्य माणसापासून ते बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना देखील लग्न हे मोठ्या जल्लोषातच करायचं असतं. पण तुम्हाला माहितेय का? एक असा सुपरस्टार आहे, ज्याने लग्नावर केवळ ५० रुपये खर्च केले! हो, फक्त ५० रुपये! आणि विशेष म्हणजे तो आज १८६२ कोटी रुपयांचा मालक आहे.
हा अभिनेता दुसरं-तिसरं कोणी नाही, तर आपल्या सर्वांचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान. अभिनेत्यानं त्याची पहिली पत्नी रीना दत्त हिच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. या लग्नाची खास गोष्ट म्हणजे त्यावर खर्च झाला होता केवळ ५० रुपये (Aamir Khan 50 Rupees Wedding Story). आमिरचा सह-कलाकार शहजाद खानने बॉलीवुड ठिकानाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमिरच्या लग्नाची गोष्ट सांगितली. शहजाद म्हणाला की, "आमिर आणि रीना दत्ताने गुप्तपणे कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यांनी फक्त ५० रुपयांत लग्न केलं होतं. आम्हाला काही जणांकडून आमिरच्या लग्नाची माहिती मिळाली होती. मी त्यांच्या लग्नाचा साक्षीदार असतो. पण मला पोहोचायला उशीर झाला. दोघांनी लग्न केलं आणि ते आपापल्या घरी गेले".
आमिर खान याने पहिलं लग्न हे रीना दत्त यांच्याशी केलं होतं. पण, हे नात फार काळ टिकलं नाही. २००२ मध्ये ते वेगळे झाले होते. आमिर खान आणि रीना या दोघांना जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. रीनापासून घटस्फोट घेतल्यानंतर २००५ मध्ये आमिरने किरण राव हिच्याशी लग्न केलं. लग्नाच्या १६ वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित विभक्त होत असल्याची माहिती दिली. या दोघांना आझाद हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही आमिरचं दोन्ही पत्नीसोबत मैत्रीचं नातं कायम ठेवलं. आता सध्या आमिर हा गौरी नावाच्या तरुणीला डेट करतोय.
आमिर खान हा कायमच साधेपणाला पसंती देताना दिसतो. आज तो करोडपती आहे, पण त्याचे निर्णय हे नेहमी विचारपूर्वक घेतलेले असतात, हीच गोष्ट त्याला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' बनवते. लवकरच तो 'सितारे जमीन पर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून आमिर खान बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. 'लाल सिंग चड्ढा' हा अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट होता.