आमिर खानला सीक्रेट सुपरस्टार हा चित्रपट या खास व्यक्तीला दाखवायचा आहे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 11:20 IST
सीक्रेट सुपरस्टार या आमिर खानच्या आगामी चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाचा निर्माता आमिर खान असून या सिनेमात ...
आमिर खानला सीक्रेट सुपरस्टार हा चित्रपट या खास व्यक्तीला दाखवायचा आहे
सीक्रेट सुपरस्टार या आमिर खानच्या आगामी चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाचा निर्माता आमिर खान असून या सिनेमात आमिरने शक्ती कुमार नावाची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील आमिरचा लूक त्याने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा असणार आहे. दंगल सिनेमात आमिरने कुस्तीपटूला साजेसा लूक साकारला होता. मात्र त्या भूमिकेपेक्षा वेगळा लूक आमिरचा सीक्रेट सुपरस्टारमध्ये रसिकांना पाहायला मिळणार आहे. विचित्र हेअर स्टाईल, अतरंगी दाढी आणि रंगीबेरंगी आणि हटके कपडे या अवतारात शक्ती कुमार म्हणजेच आमिर खान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आमिरच्या लूकची सध्या जोरदार चर्चा आहे. अनेकांना आमिरचा हा हटके लूक आवडत आहे. या चित्रपटात अभिनेत्री जायरा वसिम मुख्य भूमिकेत झळकणार आहे. जायराने आमिरच्या दंगल या चित्रपटात काम केले होते. सीक्रेट सुपरस्टार या चित्रपटाची कथा हटके असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आमिर खानला खात्री आहे. आमिर या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन करत आहे. आमिर खानचा सीक्रेट सुपरस्टार चित्रपट गानसमाज्ञी लता मंगेशकर यांनी पाहावा असे आमिर खानला वाटत आहे. त्यामुळे लता मंगेशकर यांच्यासाठी या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग ठेवण्याची त्याची इच्छा आहे. सीक्रेट सुपरस्टार या चित्रपटाची कथा एका लहान मुलीच्या आयुष्यावर बेतलेली आहे. या लहान मुलीचे संगीतावर खूप प्रेम असून ती कशा प्रकारे आपले संगीतकार बनण्याचे स्वप्न पूर्ण करते याचा प्रवास प्रेक्षकांना सीक्रेट सुपरस्टार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा संगीताशी निगडित असल्याने लता मंगेशकर यांना ती भावेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. आमिर खान हा लता मंगेशकर यांचा खूप मोठा चाहता आहे. आमिरची निर्मिती असलेल्या लगान या चित्रपटात ओ पालनहारे हे गाणे त्यांनी गायले होते. हे गाणे आमिरला खूपच आवडते. पहिल्यांदाच आमिर या सिनेमात विचित्र आणि वेगळ्या पद्धतीने नाचताना, धम्माल मस्ती करताना दिसत आहे. सध्या या सिनेमाचा प्रोमो रसिकांना चांगलाच आवडतोय. तसेच सिनेमाची गाणीही रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर १९ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीस येत आहे. Also Read : 'सिक्रेट सुपरस्टार' सिनेमासाठी आमिर खानने केलेला नवीन लूक तुम्ही पाहिला का?