Join us

'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 10:34 IST

PPV मॉडेल नक्की आहे तरी काय? काय आहेत फायदे आणि नुकसान

'लाल सिंह चड्डा'च्या अपयशानंतर आमिर खान (Aamir Khan) 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. यामध्ये आमिर खान दिव्यांग मुलांना बास्केटबॉलचं प्रशिक्षण देताना दिसणार आहे. या सिनेमाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. सहसा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर मग ओटीटीवर येतो. पण आमिरचा 'सितारे जमीन पर' थिएटर रिलीजनंतर चक्क थेट युट्यूबवर येणार आहे. 

'सितारे जमीन पर' युट्यूबवर 'पे पर व्ह्यू' मॉडेलवर रिलीज होणार आहे. याचा अर्थ युट्यूबवर सिनेमा पाहण्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत. हा प्रयोग खरंच यशस्वी होईल का हा खरा प्रश्नच आहे. फिल्म निर्मात्या अंशुलिका दुबे यांच्यानुसार, पे पर व्ह्यू मॉडल ऑनलाईन बॉक्स ऑफिससारखंच आहे. मात्र इंडस्ट्रीने अद्याप हे गांभीर्याने घेतलेलं नाही. थिएटरमध्ये १०० रुपये तिकीटामागे निर्मात्याला ३५ रुपये मिळतात. तेच पे पर व्ह्यू मध्ये याच्या ८० टक्के मिळतात. पण अडचण ही आहे की आपले फिल्ममेकर फक्त सिनेमा बनवण्यात व्यग्र असतात, बिझनेस आणि मार्केटिंगचा विचारच करत नाहीत. निर्मात्याचं खरं काम केवळ सिनेमा बनवणं नाही उलट त्या सिनेमाचा सीईओ होणं असतं."

त्या पुढे म्हणाल्या, "छोट्या निर्मात्यांजवळ थिएटर रिलीजसाठी बजेट नसतं. म्हणून नाईलाजाने ते आपले सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्म्सला विकतात. पण तिथे त्यांना एकदाच पैसा मिळतो. जर ओटीटी प्लॅटफॉर्मकडून त्यांना ५० लाख मिळत असतील तर ते हाच रिस्क न घेण्याचा विचार करतात आणि पुढच्या सिनेमांच्या तयारीला लागतात. आमिरजवळ मार्केटिंगसाठी पैसा आणि तसा माइंडसेटही आहे."

युट्यूब स्ट्रॅटेजिस्ट आदित्य कुमार यांनी मात्र हा प्रयोग रिस्की असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, "हा प्रयोग क्रिएटर्ससाी फायद्याचा आहे कारण त्यांचा प्रोडक्शनचा खर्च कमी होतो. एक व्हिडिओ बनवणं, ते प्रमोट करणं आणि त्यावर अॅड लावणं हा सगळा खर्च वाचतो. मात्र सिनेमासाठी हा प्रयोग रिस्की आहे. विशेषत: बॉलिवूड इंडस्ट्रीत हे धोक्याचं आहे जिथे सिनेमे ५० ते १०० कोटी कमावतात. अशात फक्त युट्यूब व्ह्यूजवरुन कमवणं जवळपास अशक्य आहे. आमिरच्या युट्यूब चॅनलवर २ लाखच सबस्क्रायबर्स आहेत जे त्याच्या ब्रँड व्हॅल्यूच्या तुलनेत खूप कमी आहे. लोकांना युट्यूबवर मोफत कंटेंट बघण्याची सवय आहे. पैसे भरुन युट्यूब पाहण्याची सवय त्यांना अद्याप लागलेली नाही. "

टॅग्स :आमिर खानयु ट्यूबसिनेमा