आमिर खानला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. रूपेरी पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारणारा तुमचा आमचा हाच लाडका आमिर सुरुवातीच्या काळात त्याच्या प्रँक्ससाठीही ओळखला जायचा. शूटींगच्या सेटवर सहकलाकारांसोबत त्याने केलेले प्रँक्सचे किस्से ऐकाल तर अक्षरश: हसून हसून पोट दुखेल. होय, अगदी हिरोईनच्या हातावर थुंकण्यापासून तर अशा अनेक धम्माल गोष्टी आमिरने केल्या आहेत.
‘इश्क’ या चित्रपटाच्या सेटवरचा हा किस्सा. या सेटवर आमिर अनेकदा जुहीची मजा घेत, तिच्यासोबत प्रँक करायचा. आमिरला ही सवयचं होती. आपल्या सहकलाकारांची फजिती करताना त्याला मज्जा यायची. एकदा त्याने मला भविष्य कळते, असे म्हणून जुहीला हात पुढे करायला सांगितले. पण जुहीने जसा हात पुढे केला तसा आमिर तिच्या हातावर थुंकला. या प्रकारानंतर जुही इतकी खवळली की, तिने आमिरशी बोलणे बंद केले. अर्थात दोघांनीही ‘इश्क’च्या शूटींगवर या वादाचा परिणाम होऊ दिला नाही.
आमिरला हे सगळे करण्यात मज्जा यायची. मी ज्या हिरोईनच्या हातावर थुंकलो त्या नंबर 1 झाल्यात असे तो गमतीने सांगायचा.