Join us

आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 09:43 IST

"डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच संपूर्ण कुटुंबाने...", आमिर खानच्या कुटुंबियांचं स्टेटमेंट

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) नुकताच 'सितारे जमीन पर' आला. सिनेमाची खूप प्रशंसा झाली. दरम्यान आमिरचा भाऊ फैसल खानने (Faisal Khan) नुकतंच एका मुलाखतीत आमिर आणि कुटुंबातील सदस्यांवर अनेक आरोप केले. आपल्याला १ वर्ष घरात कोंडून ठेवलं आणि वेडं ठरवलं अशा पद्धतीचे त्याने आरोप केले. फैजलच्या या आरोपांवर आता आमिरच्या कुटुंबियांकडून सविस्तर स्टेटमेंट आलं आहे. यामध्ये त्यांनी सर्व आरोपांचं खंडन केलं आहे.

आमिर खानच्या कुटुंबाने एक अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे. फैजलने अनेक घटना मोडून तोडून सांगितल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कुटुंबाने स्टेटमेंटमध्ये लिहिले, "फैजलने आई जीनत ताहिर हुसैन, बहीण निखत हेगडे आणि भाऊ आमिरवर केलेल्या आरोपांमुळे आणि प्रतिमा खराब केल्यामुळे खूप दु:खी आहोत. त्याने पहिल्यांदाच अशा प्रकारचे आरोप केले नाहीत. त्यामुळे आम्ही आमची बाजू मांडणं आणि कुटुंबाची एकजूट दाखवणं आम्हाला गरजेचं वाटतं. फैजलबद्दलचे सगळे निर्णय संपूर्ण कुटुंबाने एकजुटीने डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन घेतले आहेत. त्याच्यासाठी आमचं प्रेम, करुणा, त्याची भावनिक आणि मानसिक काळजी घेणं हे कायम राहिलं आहे. याच कारणामुळे आम्ही या वेदनादायी आणि या कठीण काळाविषयी कधीच सार्वजनिकपणे चर्चा केली नाही. आमची माध्यमांनाही हीच विनंती आहे की त्यांनी सहानुभूती दाखवावी आणि आमच्या कुटुंबाच्या खाजगी गोष्टी अशा प्रक्षोभकपणे दाखवू नये."

हे स्टेटमेंट आमिर खान, रीना दत्ता, जुनैद खान, आयरा खान, फरहत दत्ता,राजील दत्ता, किरण राव, संतोष हेगडे, सेहर हेगडे, मन्सूर खान, नुजहत खान, इम्रान खान,टिना, झेन मारी खान, पाब्लो खान या सदस्यांकडून देण्यात आले आहे. 

फैजल खानने 'मेला','फॅक्टरी','मदहोश' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच तो आमिर खानच्या 'कयामत से कयामत तक'मध्येही छोट्या भूमिकेत होता. 

टॅग्स :फैजल खानआमिर खानबॉलिवूड